वेलिंग्टन, 10 फेब्रुवारी : प्रत्येक देशाच्या संसदेमध्ये लोकप्रतिनिधींनी कसं वागावं याचे काही नियम असतात. त्याचबरोबर त्यांनी संसदेत कोणत्या पोशाखात उपस्थित राहावे याची देखील काही मार्गदर्शक तत्वं असतात. न्यूझीलंडच्या (New Zealand) संसदेतील एका लोकप्रतिनिधीला टाय घातला नाही म्हणून शिक्षा देण्यात आली आहे. त्या लोकप्रतिनिधीला यामुळे संसद सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणामुळे देशात नवा वाद निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण?
न्यूझीलंडमधील माओरी (Maori) या आदिवासी समाजाचे खासदार राविरी वेईटिटी ( Rawiri Waititi ) यांनी सभागृहात गळ्याला टाय (Necktie) बांधण्यास नकार दिला. न्यूझीलंडच्या संसदेमध्ये टाय घालण्याचा नियम आधुनिक पद्धतीला साजेसा नाही. मेक्सिन वंशाचे खासदार त्यांच्या परंपरेप्रमाणे टाय बांधतात. त्यावर कुणी आक्षेप घेत नाही. मात्र आमच्या सारख्या आदिवासी समाजालाच याची सक्ती का केली जाते? असा प्रश्न त्यांनी विचारला. टाय बांधणे हे गुलामीचे प्रतिक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सभापतींच्या निर्णयावर टीका
यापूर्वी न्यूझीलंडच्या संसदेचे सभापती ट्रेवर मलार्ड (Trevor Mallard) यांनी राविरी यांना प्रश्न विचारताना थांबवले होते. तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही टाय बांधणे आवश्यक आहे, असे मलार्ड यांनी सांगितले. राविरी यांनी त्याला नकार देताच त्यांना सभागृहाच्या बाहेर काढण्याचा आदेश सभापतींनी दिला. सभापतींच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.
राविरी हे न्यूझीलंडमधील माओरी या आदिवासी जमातीचे सदस्य आहेत. ते संसदेत गळ्यात लॉकेट घालून आले होते. त्यावर सभापतींनी त्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलावून टाय बांधण्याची सूचना केली होती. त्यावेळी देखील टाय बांधणे हे गुलामीचे प्रतिक असल्याचं सांगत राविरी यांनी त्याला नकार दिला होता.
बहुसंख्य सदस्यांना काय वाटतं?
न्यूझीलंडच्या संसद सदस्यांनी सभागृहात टाय बांधण्याची परंपरा जुनी आहे. काही दिवसांपूर्वी संसदेच्या सभापतींनी या विषयावर खासदारांकडे लेखी सूचना मागितल्या होत्या. त्यावेळी बहुसंख्य खासदारांनी ही प्रथा यापुढे देखील सुरु ठेवण्यास पाठिंबा दिला होता.
Published by:News18 Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.