फ्लोरि़डा, 25 मार्च : अमेरिकेत राहणाऱ्या क्लेअर ब्रिजेस (Claire Bridges) या 21 वर्षीय मॉडेलनं कोविड (COVID-19) उपचारादरम्यान तिचे दोन्ही पाय गमावले. पूर्ण लसीकरण करूनही तिला कोरोनाचा संसर्ग झाला. तिला जवळपास 2 महिन्यांनंतर नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कठीण परिस्थितीतून बाहेर पडून जिवंत राहिल्यानंतर क्लेअरला खूप आनंद झाला आहे. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, मॉडेल आणि गिर्यारोहक क्लेअर ब्रिजेस फ्लोरिडामध्ये राहते. तिला कोरोनाची लसही (Corona Vaccine) मिळाली होती. पण जानेवारीच्या सुरुवातीला ती कोविड पॉझिटिव्ह आली. लहानपणापासून हृदयविकारानं त्रस्त असलेल्या क्लेअरची प्रकृती कोरोना संसर्ग झाल्यानंतर लवकरच बिघडू लागली. 16 जानेवारी रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला कोविड मायोकार्डिटिस, सायनोटिक ऍसिडोसिस, रॅबडोमायोलिसिस आणि न्यूमोनिया असल्याचं तपासणीत समोर आलं. दोन्ही पाय कापावे लागले कोरोनाची लागण झाल्यानंतर क्लेअर ब्रिजेसला लिव्हर डॅमेज, किडनी फेल्युअर, रॅबडोमायोलिसिस Rhabdomyolysis अशा समस्यांमधूनही जावं लागलं. यादरम्यान पायांकडं जाणारा रक्तप्रवाह बंद झाल्यामुळं तिच्या पायांवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळं डॉक्टरांना तिचे दोन्ही पाय कापण्याचा निर्णय घ्यावा लागला. रिपोर्टनुसार, क्लेअरला जन्मतःच महाधमनी वाल्व स्टेनोसिसनं (Aortic Valve Stenosis) झाला होता. वयाच्या नवव्या वर्षी तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. तिला जन्मापासूनच अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत होता. पण कोविडनं तिचं आयुष्यच बदललं. मात्र, क्लेअरनं हार मानली नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती पुन्हा आनंदी जीवन जगत आहे. नुकताच क्लेअरनं 21 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वडिलांनी सांगितलं की, ती वाचली यासाठी ती खूप खूश आहे. व्हीलचेअरवर बसून प्रसन्न हास्य करणाऱ्या क्लेअरचे अनेक क्यूट फोटो समोर आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.