नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : गेल्या नऊ महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहेत. या युद्धात आतापर्यंत हजारो युक्रेनियन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो रशियन सैनिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. दोन्ही देशांमधील युद्ध इतक्यात थांबेल अशी चिन्हं दिसत नाहीत. युद्धग्रस्त युक्रेन सध्या रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांचा सामना करतंय. या ठिकाणचे अनेक हादरवून सोडणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच आणखीन एक हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. ‘ झी न्यूज हिंदी ’ने यासंदर्भात वृत्त दिलंय. युक्रेनमधील निप्रो शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रस्त्यावर काही गाड्या दिसत आहेत आणि नंतर अचानक एक मिसाईल तिथे येऊन कोसळते आणि सगळीकडे गोंधळ उडतो. हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. गुरुवारीच रशियाने कीव येथे कॅलिबर क्रूझ मिसाइलचा मारा केला होता, पण युक्रेनच्या यंत्रणेने त्यांना इंटरसेप्ट केलं होतं. व्हायरल होणारा हा व्हिडिओ कारच्या आतून शूट करण्यात आला आहे. रस्त्यावरून एक कार जात असल्याचं दिसत आहे, नंतर अचानक एक मिसाइल येऊन पडतं, त्यानंतर मोठा स्फोट होतो आणि सगळीकडे फक्त आगडोंब उसळतो, सगळीकडे भीती पसरते आणि गोंधळ उडतो. नंतर ज्या गाडीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय, ती गाडी मिसाइल पडलेल्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने जाते, असं या व्हिडिओत दिसतंय. हे वाचा - रशियाने केली हद्दपार, अमेरिका संतापली, जो बिडेन यांनी बोलावली बैठक व्हिडिओ शेअर करताना युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने लिहिलंय, ‘युक्रेनचे निप्रो शहर. आज 21 वे शतक आहे. दहशतवाद्यांना शिक्षा होत नाही. पण आम्ही न्याय देऊ. आम्ही इंटरनॅशनल ऑर्डरचे रक्षण करू.’ युक्रेनचे पहिले परराष्ट्र व्यवहार मंत्री एमाइन दजेपर यांनीही व्हिडिओ शेअर केला हे. ‘निप्रोमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीसह 14 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर रशियन मिसाइलचा एक तुकडा महिलेच्या शरीरात घुसला. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत,’ असं एमाइन यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलंय.
The city of Dnipro. Ukraine. Today. XXI century.
— Defense of Ukraine (@DefenceU) November 17, 2022
Terrorists are still not being punished.
We will carry out justice.
We will protect the international order. pic.twitter.com/mLUMtyvfWh
गुरुवारी रशियाने युक्रेनवर एकापाठोपाठएक खूप हल्ले केले. रशियाच्या सततच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडलं आहे. त्यातच थंडी वाढू लागल्याने तापमानाचा पारा घसरत आहे. गुरुवारी कीववर दोन क्रूझ मिसाइल्स डागण्यात आल्या, पण या घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.