युरोप, 09 जून: युरोपमध्ये (Europe) निसर्ग सौंदर्यानं समृद्ध असलेले अनेक देश आहेत. जगभरातील लोक इथलं निसर्ग सौंदर्य बघायला येतात. इतके रमणीय प्रदेश पाहून इथंच राहण्याची अनेकांची इच्छा होते. असाच एक सुंदर देश आहे इटली (Italy) आणि त्याहून सुंदर आहे इथलं एक बेट. या बेटाचं नाव आहे सिसिली (Sicily). अत्यंत रमणीय अशा सिसिलीचं नाव अलीकडच्या काळात एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. ते म्हणजे या बेटावरील मोठंमोठी घरं केवळ एक डॉलर किंवा एक युरोमध्ये विकली जात आहेत. एवढ्या सुंदर प्रदेशातील भव्य घरं अशा कवडीमोलानं विकली जात आहेत, म्हटल्यावर जगभरातील असंख्य लोकांनी इथं धाव घेतली. यात अगदी बड्या सेलेब्रिटीजचाही समावेश आहे. अमेरिकन अभिनेता लॉरेन ब्रॅको यानं देखील सॅमबुक भागामध्ये 200 वर्ष जुने घर 200 डॉलर्सना विकत घेतलं आहे.
इतक्या सुंदर ठिकाणाची घरं इतकी स्वस्त कशी विकली जातात याबद्दल सगळ्यांच्या मनात कुतूहल आहे. याची वास्तविकता जाणून घेतली तर एक प्रमुख कारण असं लक्षात येईल की, ही घरं खूप जुनी आहेत. आजच्या काळात त्यांची देखभाल (Maintenance), दुरुस्ती करणं अत्यंत महागडं आहे. त्यामुळं इथले स्थानिक लोकंही ही घरं विकत घेण्यासाठी पुढं येत नाहीत. इथलं राहणीमान देखील (Lifestyle) खूप खर्चिक आहे. जे स्थानिक लोकांना परवडत नाही. त्यामुळं ही घरं इतक्या स्वस्त किंमतीत विकायला काढण्यात आली आहेत.
हेही वाचा- मुंबईत रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, कुर्ला ते CSMT लोकल बंद
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, इटलीच्या दक्षिण भागातील अनेक लोकं उत्तम आयुष्याच्या ओढीनं अमेरिकेत गेले. त्यावेळी सिसिलीतील ग्रामीण जीवन खूपच कठीण होते. इथलं हवामान खूपच खराब होतं, पुढचं वर्ष कसं असेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळं अनेकांनी आपली घरदारं सोडून अमेरिकेत आश्रय घेतला. हे लोक कधीच इटलीला परत आले नाहीत. अशा पिढ्यानपिढ्या गेल्या. इथली घरं अशीच पडून राहिली. वारसदारांना ही मालमत्ता हस्तांतरीत होत राहिली, पण कोणालाच त्यात रस नसल्यानं अखेर या घरांची विक्री करण्याचा निर्णय अनेक वारसांनी घेतला आणि कवडीमोलानं ही घरं विकण्याची सुरुवात झाली.
शेकडो वर्षांपूर्वी ही घरं बांधली गेली आहेत. त्यातील बहुतांश घरं अनेक वर्षे देखभाल नसल्यानं अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळं स्वस्तात घर मिळतेय म्हणून आशेनं धावणाऱ्या लोकांनी अतिशय काळजीपूर्वक हा सौदा करणं गरजेचं आहे. इथल्या घराच्या भिंती चांगल्या असतील. पण छत कमकुवत झालं असेल, तर कमी खर्चात दुरुस्ती होऊ शकते. छत गळत असेल आणि भिंतींचंही नुकसान झालं असेल. तर मात्र याचा दुरुस्तीचा खर्च खूपच जास्त असेल. काहीवेळा संपूर्ण घर पाडून पुन्हा बांधण्याचीही गरज भासू शकते. त्यामुळं घर घेताना त्याची किती दुरुस्ती करावी लागणार आहे. याची बारकाईनं पाहणी करणं आवश्यक आहे. अनेक घरं चांगल्या अवस्थेत देखील आहेत. मात्र ती एक डॉलर किंवा एक युरोला मिळत नाहीत. तसंच इथल्या भागात एकच आर्किटेक्ट आणि एकच बिल्डर असतो. त्यामुळं त्यांच्याकडूनच काम करून घेण्याशिवाय पर्याय नसतो. ते प्रामाणिक आणि विश्वासार्ह आहेत की नाही याची खात्री करुन घेणं देखील आपलीच जबाबदारी असते. त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून एक डॉलर किंवा एक युरोचं घर घेण्यासाठी इथं धाव घेणं योग्य ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.