ब्रिटन, 22 ऑक्टोबर : ब्रिटनच्या तिसर्या महिला पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरुवारी (20 ऑक्टोबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला. ट्रस यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यांनी लंडनमधल्या 10 डाउनिंग स्ट्रीटवरच्या कार्यालयात राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे, राजीनामा देण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी संसदेत स्वतःचा एक लढवय्या आणि जबाबदारीपासून न पळणारी व्यक्ती म्हणून उल्लेख केला होता. ट्रस यांचे धोरणात्मक निर्णय, मंत्रिमंडळातला गोंधळ आणि अंतर्गत अडथळे असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचं नेतृत्व करण्याच्या क्षमतेविरुद्ध उघड बंड झाल्यामुळे त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. लिझ ट्रस यांनी केवळ 45 दिवस पंतप्रधान म्हणून काम केलं असलं, तरी त्या आता मोठ्या पेन्शनच्या धनी ठरल्या आहेत. लिझ ट्रस यांना दर वर्षी सरकारच्या वतीने एक लाख 15 हजार पाउंड मिळणार आहेत. भारतीय रुपयांच्या मूल्यात विचार केला तर ही रक्कम एक कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, लिझ ट्रस यांना दर वर्षी नागरिकांनी जमा केलेल्या टॅक्समधून एक लाख 15 हजार पाउंड दिले जातील. ही रक्कम पब्लिक ड्युटी कॉस्ट अलाउन्सद्वारे (PDCA) काढता येते. माजी पंतप्रधानांना निवृत्तीनंतर सार्वजनिक जीवनात क्रियाशील राहता यावं, यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती. (UK Crisis : लिज ट्रस यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, ब्रिटनचं राजकीय संकट वाढलं) सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हे पेमेंट पब्लिक ड्युटीज सुरू ठेवण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी दिलं जातं. मार्च 1991मध्ये जेव्हा मार्गारेट थॅचर यांनी राजीनामा दिला होता तेव्हा या भत्त्याची सुरुवात करण्यात आली होती. झोन मेजर यांनी या भत्त्याचा प्रस्ताव मांडला होता. सर्वांत कमी कार्यकाळ असलेल्या पंतप्रधान ब्रिटनच्या परराष्ट्र आणि व्यापार मंत्री असताना भारतासोबत मजबूत द्विपक्षीय संबंधांचा पुरस्कार लिझ ट्रस यांनी केला होता. त्यांनी गेल्या महिन्यात भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून 10 डाउनिंग स्ट्रीटवर (ब्रिटिश पंतप्रधान कार्यालय) प्रवेश केला होता. 45 दिवसांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी राजीनामा दिल्याने त्या ब्रिटनच्या इतिहासातल्या सर्वांत कमी कार्यकाळ असलेल्या पंतप्रधान ठरल्या आहेत. यापूर्वी 1827 मध्ये जॉर्ज कॉनिंग आपल्या मृत्यूपर्यंत 119 दिवस या पदावर राहिले होते. अशी होईल नवीन पंतप्रधानांची निवड कन्झर्व्हेटिव्ह पक्ष ट्रस यांच्या जागी नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी निवडणूक घेणार आहे. येत्या आठवडाभरात त्यांचीनिवड केली जाईल. यासाठी सोमवारी (24 ऑक्टोबर) दुपारपर्यंत नामांकन दाखल करता येईल. पदासाठी दावेदारी दाखल करणाऱ्या उमेदवारांना 357 कंझर्वेटिव्ह खासदारांपैकी 100 जणांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असेल. (काय सांगता… फक्त 26 वर्षांची तरुणी बनली देशाची हवामान मंत्री; वाचा सविस्तर) म्हणजे जास्तीत जास्त तीन उमेदवार रिंगणात असू शकतील. सर्व खासदार तीनपैकी एकाला बाद करण्यासाठी मतदान करतील. त्यानंतर शेवटच्या दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी टोकन मतदान होईल. त्यानंतर पक्षाच्या एक लाख 72 हजार सदस्यांना ऑनलाइन मतदानात एका उमेदवाराची निवड करावी लागेल. 28 ऑक्टोबरपर्यंत ब्रिटनला नवीन पंतप्रधान मिळतील. जॉन्सन आणि ऋषी सुनक प्रबळ दावेदार माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह, यूकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि हाउस ऑफ कॉमन्सचे नेते पेनी मॉरडांट हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत. सट्टेबाजांनीदेखील या तीन नावांना जास्त पसंती दिली आहे. अनेक वादांमध्ये अडकल्यानंतर बोरिस जॉन्सन यांना पक्षाने राजीनामा देण्यास भाग पाडलं होतं. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर जॉन्सन खासदार आहेतच; पण आपण ही निवडणूक लढवणार की नाही याबद्दल त्यांनी अद्याप काहीही सांगितलेलं नाही. परंतु, संसदेतले त्यांचे सहकारी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.