काबूल, 31 ऑगस्ट : अमेरिकेने (America) अफगाणिस्तानमधून ( Afghanistan) आपलं सैन्य परत बोलावलं आहे. 20 वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर आपल्या सैनिकांना घेऊन येणाऱ्या अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तान सोडलंय. अफगाणिस्तानातून बाहेर पडलेला शेवटचा अमेरिकन सैनिक मेजर जनरल क्रिस डोनह्यू (Major General Chris Donahue) आहे, असं अमेरिकेतील संरक्षण विभागाने पेंटॅगॉनने सोमवारी घोषित केलं. त्यामुळे आता अफगाणिस्तान हा अमेरिकी लष्कराच्या वर्चस्वापासून अधिकृतरित्या मुक्त झाला आहे. अमेरिकेच्या सैन्य वापसीमुळे तालिबानने (Taliban) आतषबाजी करत आणि हवेत गोळीबार करत जल्लोष केला.
अफगाणिस्तान येथून अमेरिकेचे सैनिक परत जाताच तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद यांनी म्हटलं की, अफगाणिस्तान आता पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे. काबूल विमानतळ हे पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आहे. दरम्यान, अमेरिकेचे सैन्य परत जाताच तालिबानने केलेल्या हवेतील गोळीबारामुळे काबूल येथील स्थानिक लोक भयभीत झाले. पण हा कुठलाही हल्ला नसून अमेरिकेच्या सैनिकांनी अफगाणिस्तान सोडल्याचा आनंद व्यक्त केला जात असल्याचं तालिबानने स्पष्ट केलं आहे.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तान सोडलं आणि त्यांच्या सैन्याची शेवटची तुकडी अफगाणिस्तानातून 30 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता निघाली. ही माहिती प्रथम पेंटागॉनने (Pentagon) दिली आणि त्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेतल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनी अधिकृत घोषणा केली. अफगाणिस्तानमध्ये मागील 20 वर्षांपासून असलेलं अमेरिकी सैन्य आता परत आलं आहे, असं ते म्हणाले आहेत. 'गेल्या 17 दिवसांत आमच्या सैनिकांनी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी एयरलिफ्ट योजना राबवली आहे. अतुलनीय धैर्य आणि निर्धाराने त्यांनी ही कामगिरी पार पाडली आहे. अफगाणिस्तानमध्ये मागील 20 वर्षांपासून असलेलं सैन्य आता परत आलं आहे,’ असंही बायडन यांनी सांगितलं.
पेंटागॉन या अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटलं की, 20 वर्षानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीचं काम पूर्ण झालं आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडलेला शेवटचा अमेरिकन सैनिक मेजर जनरल क्रिस डोनह्यू (Major General Chris Donahue) आहे. 30 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावरून अमेरिकेच्या सैनिकांना घेऊन येणाऱ्या शेवटच्या C-17 विमानात तो चढला होता. तसंच यूएस सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी पेंटागॉनच्या पत्रकार परिषदेत अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार पूर्ण झाल्याची घोषणा केली.
कोण आहेत मेजर डोनह्यु?
अफगाणिस्तानमधून बाहेर पडणारा अमेरिकेचा शेवटचा सैनिक मेजर जनरल क्रिस डोनह्यू हे 52 वर्षाचे आहेत. दक्षिण कोरिया आणि पनामामध्ये सेवा करण्याचा त्यांचा तीस वर्षांचा अनुभव आहे. 2 स्टार प्राप्त मेजर जनरल डोनह्यू यांना अफगाणिस्तान, इराक, सीरिया, लिबिया आणि पूर्व युरोपमध्ये विविध ऑपरेशनसाठी 17 वेळा तैनात केलं गेलं आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीचा मोठा भाग विशेष दलांसोबत काम केलं आहे. त्यांनी न्यूयॉर्कच्या वेस्ट पॉईंट येथील युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली. त्यांची पहिली नेमणूक दक्षिण कोरियामधील 2 री इन्फंट्री डिव्हिजन आर्मीमध्ये रायफल प्लाटून लीडर म्हणून होती.
दरम्यान, तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत मदत मोहिमेला मुदत देऊन देश सोडण्यास सांगितलं होतं. त्यामुळे 31 ऑगस्टच्या शेवटापर्यंत अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याची मोहीम चालेल असा अंदाज होता. मात्र, अमेरिकेने 30 ऑगस्टच्या रात्रीच अफगाणिस्तान सोडलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban