नवी दिल्ली , 20 जानेवारी : जो बायडन (Joe Biden) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर कमला हॅरिस (Kamala Harris) देखील उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या दोघांचंही भारताशी कनेक्शन आहे. कमला हॅरिस तर भारतीय वंशाच्या आहेतच, पण बायडनसुद्धा भारताशी थेट नातं टिकवून आहे. आपल्या नागपूरशी त्यांचं कनेक्शन आहे. अमेरिकेच्या ह्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं नागपूरशी अगदी जवळचं असं नातं आहे. त्यांनी कित्येकदा आपल्या भाषणांमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. बायडन यांचे काही नातेवाईक नागपूरला 1873 पासून राहत आहेत. कमला हॅरिस देखील तामिळनाडू मधील एका गावातल्या आहेत.
पहिल्यांदा बायडन यांनी त्यांच्या नातेवाईकांचा उल्लेख 2013 आणि 2015मध्ये केला होता. 2013 मध्ये जो बायडन जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते, तेव्हा भारतात आले असताना त्यांनी आपल्या नातेवाईकांचा उल्लेख केला होता. बायडन म्हणाले, '1972 मध्ये मी जेव्हा सीनेटर झालो तेव्हा मला भारतामधील नातेवाईकांचं पत्र मिळालं होतं.' बायडन यांचे पूर्वज इस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला होते. त्याच्यापैकी काही जण ब्रिटीशांच्या काळात भारतात आले होते. तेव्हापासून त्यांचे नातेवाईक भारतामध्येच स्थायिक झाले.
नागपूरमध्ये स्थायिक असलेल्या लेस्ली बायडन यांनी जो बायडन यांना पत्र लिहीलं होतं. बायडन राष्ट्रपती झाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांना पीटीआय संस्थेशी बोलताना दिली. त्याच्याच नातेवाईकांपैकी असलेल्या सोनिया बायडन यांनी सांगितलं, ‘नागपूर, मुंबई न्यूझीलंड आणि अमेरिकेत राहतात.’ 2018 मध्ये झालेल्या एका लग्नासाठी विविध देशातले बायडन कुटुंबीय एकत्र जमले होते.
मुंबईत 24 जुलै 2013 मध्ये शेअर मार्केटच्या एका कार्यक्रमासाठी बायडन यांना आमंत्रण होतं. या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, ‘मला माझ्या नागपूरमधील नातेवाईकांकडून पत्र मिळालं होतं. बायडन कुटुंबाचे पूर्वज 18 व्या शतकामध्ये इस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे.’ मात्र पुढे या पत्रावरुन आपण त्या कुटुंबाशी फारसा संवाद साधू शकलो नाही आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवता आली नाही असं सांगत जो बायडेन यांनी खेदही व्यक्त केला होता. आपल्या भारताबद्दलच्या कनेक्शनसंदर्भात बोलताना त्यांनी मस्करीमध्ये, ‘भविष्यात मी भारतातूनही निवडणूक लढवू शकतो’ असंही म्हटलं होतं.
आता जो बायडन आणि कमला हॅरिस ह्याचं हे भारतीय कनेक्शन भारतासाठी किती फायदेशीर ठरतं हे पाहणं हे औत्सुक्याचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Joe biden, US President