वॉशिंग्टन, 26 फेब्रुवारी : अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन (Joe Biden) यांची निवड होताच अमेरिकेचं सैन्य पश्चिम आशियामध्ये (West Asia) सक्रीय झालं आहे. अमेरिकेनं गुरुवारी सीरियामध्ये (Syria) हवाई हल्ले (Air Strike) केले. अमेरिकेनं सीरियातील इराणचा (Iran) पाठिंबा असलेल्या मिलिशिया भागामध्ये रॉकेट हल्ले केले, अशी माहिती दोन अधिकाऱ्यांनी त्यांचं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेला दिली आहे. का केला हल्ला? मिलिशियातील एका गटानं इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेनं हा हल्ला केला. हा हल्ला सीरियातील तळापुरातच मर्यादीत ठेवून याची व्याप्ती वाढणार नाही, याची खबरदारी अमेरिकेनं घेतली आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात नेमकं किती नुकसान झालं आहे, याची माहिती अजून मिळालेली नाही. जगाची सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर महिनाभरातच हा हल्ला करत जो बायडेन यांनी आपलं धोरण स्पष्ट केलं आहे. ‘शिया दहशतवाद्यांकडून वापर होत असलेल्या तळावर अमेरिकेनं हल्ला केला आह, याची मला खात्री आहे,’ असा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी केला आहे. यापूर्वी हा हल्ला आमच्या राजकीय सहकाऱ्यांशी चर्चा करुन उचलेलं पाऊल होतं, आम्ही आमचे सहकारी आणि अमेरिकेचं सैन्य यांचं संरक्षण करणार, असं पेंटागॉनच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केले होते. ( वाचा : अमेरिकन भारतीयांना दिलासा! ट्रम्पच्या निर्णयाला डावलत, जो बायडन यांनी दिला ग्रीन कार्डला ग्रीन सिग्नल! ) अमेरिकेची ही कारवाई 2500 जणांपुरतीच मर्यादीत होती. आता अमेरिका इस्लामिक स्टेट्स विरुद्ध इराकच्या सुरु असलेल्या युद्धामध्ये सहभागी नाही. अमेरिकेच्या दूतावासावर 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी एका शिया दहशतवादी संघटनेनं घेतली होती. अमेरिका आणि इराणमध्ये 2015 साली झालेला अण्विक करार पुन्हा एकदा लागू करण्याच्या हलचाली सुरु झाल्या असतानाच दहशतवादी संघटनेनं हा हल्ला केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.