Explainer: म्यानमारमधल्या लष्करी उठावामागे खरंच चीनचा हात आहे का?

Explainer: म्यानमारमधल्या लष्करी उठावामागे खरंच चीनचा हात आहे का?

म्यानमार (Myanmar) हा देश भारताला लागून आहे. त्यामुळे त्या माध्यमातून चीन भारतातल्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये अशांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतो.

  • Share this:

यांगून (म्यानमार), 03 फेब्रुवारी: म्यानमारमध्ये (Myanmar coup) रातोरात घटनाक्रम वेगाने बदलला आणि नवं सरकार सत्तेवर येणार असताना सैन्याने (Army) सत्ता ताब्यात घेतली. सर्वोच्च नेत्या आंग स्यान स्यू की (Aung Syan Suu Ki) यांच्यासह सगळे नेते तुरुंगात आहेत. यावर सगळ्या जगाने टीका केली; मात्र चीनने त्यावर मौन राखलं आहे. अशीही अटकळ बांधली जात आहे, की चीननेच म्यानमारवर कब्जा मिळवण्यासाठी सैन्याचा आधार घेतला आहे.

तणावाची सुरुवात

बऱ्याच काळापासून म्यानमारला चीनचं 'मागचं दार' असं म्हटलं जात होतं. म्यानमारच्या खलाशांच्या माध्यमातून चीनने जगभर आपल्या व्यापाराचं जाळं पसरवलं होतं. अलीकडे चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चीनपेक्षा म्यानमारने भारताशी संबंध वृद्धिंगत केले, तर चीन हवालदिल झाला. त्यानंतर म्यानमारमध्ये राजनैतिक अस्थिरता निर्माण होण्यासाठी चीन वारंवार प्रयत्न करू लागला. आत्ताच घडलेल्या सत्तापालटातही चीनचा काही ना काही तरी हात असल्याचं मानलं जात आहे, विशेषकरून या घटनेवर चीनने काहीच प्रतिक्रिया व्यक्त न केल्यामुळे...

स्थानिक दहशतवाद्यांशी चीनचं संगनमत

चीनचे म्यानमारच्या अनेक कट्टरतावादी समूहांशी चांगले संबंध आहेत. अनेकदा म्यानमारच्या सीमेवर दहशतवाद्यांना चीनच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पकडण्यात आलं आहे. युरोपियन फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज या अॅमस्टरडॅमस्थित थिंक टँकने असा दावा केला होता, की  वांशिक समूह (Ethnic Communities) आणि सैन्य यांच्या माध्यमातून चीन म्यानमारमध्ये लोकशाही संपुष्टात आणून आपलं तिथलं स्थान पुन्हा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.

चीन म्यानमारमध्ये दहशतवादी (Terrorists) पसरवू इच्छितो. कारण त्या देशात आपल्या अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळायला हवी, अशी चीनची इच्छा आहे. सध्या तसं चिन्ह दिसत नाही. त्यामुळे चीन अराकान आर्मी (Arakan Army) या म्यानमारचे दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या संघटनेच्या मदतीने सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे, भारतासोबत चीनचं वैर आहे आणि म्यानमारचे भारताशी मित्रत्वाचे संबंध आहेत. राजनैतिक आणि व्यापारी अशा दोन्ही तत्त्वांवर भारत-म्यानमार संबंध दृढ आहेत. या दोन देशांमधील सीमा 1640 किलोमीटर लांबीची आहे.

2017मध्ये भारताला म्यानमारमध्ये रस्ते तयार करण्याचा 220 दशलक्ष डॉलरचा प्रोजेक्ट मिळाला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत भारत-म्यानमारसह थायलंडही आंतरराष्ट्रीय महामार्गासाठी काम करतो आहे, जेणेकरून तिन्ही देशांत दळणवळण, पर्यटन आदी गोष्टींना प्रोत्साहन मिळेल. त्याच वेळी म्यानमारने चीनच्या वन बेल्ट-वन रोड (One Belt One Road) या प्रकल्पात सहभागी होण्यास नकार दिला. या साऱ्यामुळे रागावलेल्या चीनने अराकान आर्मी या दहशतवादी संघटनेला निधी पुरवायला सुरुवात केली.

म्यानमार (Myanmar) हा देश भारताला लागून आहे. त्यामुळे त्या माध्यमातून चीन भारतातल्या ईशान्येकडच्या राज्यांमध्ये अशांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतो. अराकान आर्मी या दहशतवादी संघटनेला (Terrorist Organization) आर्थिक पाठबळ पुरवून म्यानमारसोबतच भारतातही परिस्थिती बिघडवायची, असा चीनचा मनसुबा आहे.

अराकान आर्मीचं काम कसं आहे?

म्यानमारच्या चीनला लागून असलेल्या राखिन स्टेट या भागात अराकान आर्मी ही दहशतवादी संघटना काम करते. एप्रिल 2009मध्ये तयार झालेला हा देशातला सगळ्यात मोठा दहशतवादी गट मानला जातो. हा समूह देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असं म्यानमारच्या दहशतवादविरोधी समितीने सांगितलं आहे. रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी हा समूह सशस्त्र संघर्ष करत असून, त्याचे बरेचसे सदस्य हे बांगलादेशातून अवैधरीत्या आलेले शरणार्थी आहेत. या संघटनेकडून पोलिस, सैन्यासह सामान्य नागरिकांवरही वारंवार हल्ले केले जातात.

चीनकडून मदत

इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपच्या म्हणण्यानुसार, अराकान आर्मी ही एक अतिरेकी संघटना असून, त्याचे सदस्य परदेशात, खासकरून चीनमध्ये जाऊन शस्त्रास्त्रं चालवण्याचं, लोकांना आपल्या संघटनेत ओढण्याचं आदी गोष्टींचं प्रशिक्षण घेतात. म्यानमारच्या सैन्याचे प्रवक्ता ब्रिगेडियर जनरल जॉ मिन टुन यांच्या म्हणण्यानुसार, 2019पासून हे दहशतवादी चीनमध्ये तयार झालेल्या हत्यारांच्या साह्याने म्यानमारच्या सैन्यावर वारंवार हल्ले करत आहेत. त्याच वर्षी एका छाप्यादरम्यान दहशतवाद्यांकडून सुमारे 90 हजार डॉलर किमतीची शस्त्रास्त्रं मिळाली. ती शस्त्रं चीनमध्ये तयार झालेली होती.  चीनकडून शस्त्रास्त्रं, पैसे आदींच्या पुरवठ्यासह शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं.

म्यानमार राजनैतिकदृष्ट्या कमजोर राहावा, अशीच चीनची इच्छा आहे. टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तानुसार, म्यानमारमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी चीन केवळ अराकान आर्मीच नव्हे, तर आणखीही अनेक संघटनांना पैसे आणि शस्त्रास्त्रांची मदत पुरवत आहे. त्यामुळे तो देश आपल्या अंतर्गत सुरक्षेच्या लढाईतच व्यग्र राहावा आणि खासकरून भारत, तसंच विकसित पाश्चिमात्य देशांसोबत म्यानमारचे चांगले संबंध प्रस्थापित होऊ नयेत, अशी माहिती एका स्रोताने दिली आहे.

या सगळ्यामुळे चीनचे म्यानमारच्या लष्कराशी चांगले संबंध आहेत; पण नव्या नेत्या आंग स्यान स्यू की यांच्याशी मात्र चीनची जुळत नव्हतं. त्यांचा भारताकडे असलेला कल हेही त्यामागचं एक कारण. नोबेल पुरस्काराने सन्मानित असलेल्या आँग स्यान स्यू की यांनी नवी दिल्लीतल्या लेडी श्रीराम कॉलेजातून 1964 साली पदवी घेतली होती. त्यामुळे त्यांचा स्वाभाविकपणे भारताकडे कल आहे आणि तो त्यांच्या बोलण्याचालण्यातूनही दिसतो.

Published by: Aditya Thube
First published: February 3, 2021, 12:42 PM IST

ताज्या बातम्या