इराणच्या लष्कराने पाश्चात्य देशांसह जगाला आपली ताकद दाखवण्यासाठी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या या ड्रोनचे फोटो जाणूनबुजून उघड केल्याचं मानलं जात आहे.
इराणला मीडियाच्या माध्यमातून ड्रोन्स दाखवून आपली लष्करी ताकद दाखवायची आहे. इराणच्या लष्कराने या अंडरग्राउंड ड्रोन तळाबाबत काही माहिती दिली असली तरी, त्याचं ठिकाण उघड केलेलं नाही.
इराणी मीडियानुसार, डोंगराखाली बांधलेल्या या बोगद्यांमध्ये किमान 10 ड्रोन (Underground Drone Base) ठेवण्यात आले आहेत. इराणने जारी केलेला त्याचा फोटो पाहून आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
इराणीच्या राज्य माध्यमांनी सांगितलं की, झाग्रोस पर्वताच्या आत बांधलेल्या या बोगद्यांमध्ये एबेल-5 सारखी प्राणघातक ड्रोन्स ठेवलेली आहेत आणि त्यामध्ये काएम-5 सारखी अचूक क्षेपणास्त्रं बसवण्यात आली आहेत.
काएम-5 क्षेपणास्त्र इराणनेच बनवलं असून हे क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. इराणचे हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या हेलफायर क्षेपणास्त्राइतकंच धोकादायक आहे.
ड्रोन ताफ्याचे फोटो समोर आल्यानंतर इराणच्या लष्कराचे कमांडर मेजर जनरल अब्दुल्लारहीम मौसावी यांनी सांगितलं की, इराणचं सैन्य या भागातील सर्वात मजबूत सैन्य आहे.
मेजर जनरल म्हणाले की, इराण लष्कराचे ड्रोन कोणत्याही परिस्थितीत शत्रूवर तत्काळ प्रतिहल्ला करण्यास तयार आहेत. ते म्हणाले की, आम्ही आमचे ड्रोन सतत अपडेट करत असतो.
माहिती देताना इराणच्या सरकारी मीडियाच्या एका टीव्ही पत्रकाराने सांगितलं की, गुरुवारी त्याला इराणच्या केरमेनशाह येथून 45 मिनिटांच्या हेलिकॉप्टरने एका गुप्त बोगद्यावर नेण्यात आलं. त्यांनी सांगितलं की संपूर्ण प्रवासादरम्यान त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली होती. जेणेकरून त्यांना रस्ता दिसू नये आणि जेव्हा ते गुप्त तळावर पोहोचले, तेव्हा त्यांचे डोळे उघडले.
इराणी मीडियातून समोर आलेल्या गुप्त तळाच्या फोटोंमध्ये ड्रोन बोगद्यात रांगेत उभे असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. हा बोगदा अनेक किलोमीटर लांब असल्याचं दिसतं.
हा बोगदा केवळ लांबच नाही तर, तो जमिनीपासून खूप खाली आहे. इराणी सैन्याच्या रक्षकांनी त्याच बोगद्यात दोन ग्रीक टँकरही ठेवले होते.