वॉशिंग्टन, 21 एप्रिल: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासासाठी (NASA) मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नासाच्या ‘इनजेन्युइटी’ (Ingenuity) या मिनिएचर रोबोहेलिकॉप्टरनं (Helicopter) मंगळ ग्रहावर यशस्वी उड्डाण केलं. नासाच्या या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. पॉवर्ड आणि कंट्रोल फ्लाईटच्या रूपात दुसऱ्या ग्रहावर हेलिकॉप्टर पाठवण्याची ही पहिलीच वेळ होती. जेझिरो क्रेटर येथून म्हणजे पृथ्वीपासून अंतराळात 173 दशलक्ष मैल दूर ठिकाणावरून हेलिकॉप्टरचं उड्डाण झालं. सहा वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आलेल्याया हेलिकॉप्टरनं यशस्वी उड्डाण केलं. नासानं या ऐतिहासिक घटनेचं थेट प्रक्षेपण केलं होतं. 21 व्या शतकातील राईट बंधूचा क्षण असं नासानं, या घटनेबाबत म्हटलं आहे.
नासाच्या मंगळ मोहिमेमधील हे मोठं यश असून,या यशाचं श्रेय भारतीय इंजिनीअर बॉब बलराम (Bob Balram)यांना जातं. बॉब गेल्या वीस वर्षांपासून नासामध्ये काम करत आहेत. बॉब यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. भारतीयांना अभिमान वाटावा, असा हा क्षण असून, सोशल मीडियावर बॉब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरचं डिझाइन बॉब बलराम यांनी केलं होतं. मंगळावर गुरुत्वाकर्षण अतिशय कमी असल्यानं लॅडिंग आणि टेक ऑफ, या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आहेत. त्यामुळे अत्यंत कमी म्हणजे अवघ्या 1800 ग्रॅम वजनाचं हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आलं होतं.
दक्षिण भारतात 1960 मध्ये जन्मलेल्या बॉब बलराम यांना लहानपणापासूनच अंतराळविज्ञानात रुची होती. अपोलो यान चंद्रावर उतरल्याची बातमी ऐकून त्यांची या क्षेत्रातील आवड आणखीनच वाढली होती. 1975-80 दरम्यान, आयआयटी मद्रासमधून (IIT Madras) मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील बी. टेकची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणारी सर्वांत जुनी युनिव्हर्सिटी रेन्ससिलर पॉलिटेक्निक संस्थेतून (Rensselaer Polytechnic Institute) कॉम्प्युटर अँड सिस्टीम इंजिनीअरिंगमध्ये एम.एस आणि त्यानंतर पीएचडी प्राप्त केली.
सध्या बॉब बलराम नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये मार्स हेलिकॉप्टर स्काऊट प्रोजेक्टचे मुख्य इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. याआधी बॉब यांनी मार्सवरील लँडिंग मेथड्सबाबत संशोधन केलं असून, अॅडव्हान्स्ड सिम्युलेशन टेक्निक्सवर काम केलं आहे. बॉब यांनी हाय फिडेलिटी ईडीएल सिम्युलेटर विकसित करणाऱ्या तुकडीचं नेतृत्व केलं आहे. क्युरिऑसीटी आणि पर्सीव्हिअरन्स मोहिमांमध्ये त्यांनी विकसित केलेल्या सिम्युलेशन्सचा वापर करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.