वॉशिंग्टन, 3 ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड 19 ची लागण झाल्यानंतर ते सध्या वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. पण या हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच त्यांना प्रायोगिक म्हणजे अजून ज्यावर प्रयोग सुरू आहेत असं औषध देण्यात आलं आहे. कोविडमुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णावर या औषधाचा चांगला परिणाम झाल्याचं प्रयोगांतून लक्षात आलं आहे.
रिजनरॉन फार्मास्युटिकल्स आयएनसी या कंपनीने हे औषध तयार केलं असून ते अँटिबॉडी ड्रग आहे. ट्रम्प यांच्या डॉक्टरांनी विनंती केल्यामुळे अनुकंपा तत्त्वावर आम्ही या औषधाचा एक डोस दिला आहे. हे औषध आयव्हीच्या माध्यमातून रुग्णाला दिलं जातं. या औषधावरील प्रयोग अद्याप सुरू आहेत तरीही एखाद्या रुग्णाच्या परिस्थितीला अनुसरून ते देता येतं त्याच पद्धतीने हे औषध ट्रम्प यांना देण्यात आलं आहे, अशी माहिती रिजनरॉन फार्मास्युटिकल्स या कंपनीने दिली आहे. ट्रम्प यांना दिलेलं औषध हे चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात असून, ते किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. कोरोना विषाणूच्या बाधेनंतर होणाऱ्या गंभीर आजारावर परिणामकारकपणे उपचार करणारं एकही औषध अद्याप सापडलेलं नाही.
हे ही वाचा-
डोनाल्ड ट्रम्प यांना सर्दी आणि श्वास घेण्याचा त्रास, VIDEO पोस्ट करून म्हणाले...
तूर्तास ट्रम्प यांना कमी प्रमाणात कोविडची लक्षणं आणि थकवा जाणवत आहे. हे अँटिबॉडी ड्रग याआधी अनेकांना उपकारक ठरलं आहे. त्यामुळे तेच ट्रम्प यांना देण्यात येईल, असा अंदाज कोरोनाबद्दल अभ्यास करणारे मिनिसोटी विद्यापीठातील फिजिशियन डॉ. डेव्हिड बाउलवेअर यांनी व्यक्त केला होता.
अँटिबॉडी कशा काम करतात
शरीराला संसर्ग झाल्यावर शरीर अँटिबॉडीज तयार करतं. अँटिबॉडीज ही प्रथिनं असतात जी विषाणूला चिकटतात आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी शरीराच्या प्रतिकारशक्तीला मदत करतात. लस शरीराला जाणीव करून देते की शरीराला संसर्ग झाला आहे. त्यानंतर शरीरी अँटिबॉडी तयार करायला सुरुवात करतं. प्रयोगशाळेत किंवा प्राण्यांवरील प्रयोगांमध्ये ज्या अँटिबॉडींनी सत्वर कार्य केलेलं असतं त्या अँटिबॉडी या औषधाच्यामार्फत रुग्णाला दिल्या जातात. रिजनरॉन्सच्या औषधात दोन अँटिबॉडी आहेत ज्या कोरोनाविरुद्ध चांगला परिणाम दाखवतात. या कंपनीने या आधी अँटिबॉडींच्या कॉम्बिनेशनमधून ईबोलासाठी उपचार शोधून काढले आहेत.
आतापर्यंतची प्रगती
रिजनरॉनचं हे औषध एखदाच आयव्हीमार्फत दिलं जातं. कोरोना होऊ नये म्हणून आणि झालेल्या गंभीर रुग्णांना बरं करण्यासाठी असा दोन प्रकारे या ओषधाचा वापर कंपनी करत आहे. रुग्णालयात दाखल करायची गरज नसलेल्या 275 कोविड रुग्णांना हे औषध देण्यात आलं होतं त्यांच्यावर त्याचा काही प्रमाणात प्रभाव जाणवल्याचं रिजनरॉन कंपनीनी सांगितलं आहे. याबद्दलचा अभ्यास पूर्ण झाला असून तो कंपनीकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहे.
ट्रम्प घेत होते अस्प्रिन
ट्रम्प आतापर्यंत झिंक, व्हिटॅमिन डी, फॅमोटिडाइन, मेलॅटोनिन आणि अस्प्रिन ही औषधं घेत होते. यापैकी कुठलंही औषध कोविडविरुद्ध परिणामकारक ठरलं नाही. ट्रम्प यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन घेतलेलं नाही, असं त्यांचे डॉक्टर सिएन कॉनले यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.