टोकियो, 25 फेब्रुवारी : जपानच्या हमामात्सु शहरात समुद्र किनाऱ्यावर एक मोठा लोखंडी गोळा आढळून आला आहे. यामुळे जपानच्या लष्करासह, पोलिस आणि तटरक्षक दल अलर्ट झाले होते. हा गोळा नेमका कशाचा याची माहिती नसल्याने जपानमध्ये खळबळ उडाली होती. आता या गोळ्याबाबत माहिती समोर आली आहे. हा गोळा मरीन इक्विपमेंट असल्याचं सांगण्यात येत आहे.
भला मोठा लोखंडी गोळा वाहून समुद्र किनारी आला तेव्हा लोकही आश्चर्यचकीत झाले होते. काहींनी याला Godzilla's Egg असंही म्हटलं होतं. तर काहींनी स्पाय बलून असल्याचं म्हटलं. मात्र न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी या गोळ्याची एक्सरे टेस्ट केली, त्यानंतर हे स्फोटक नसल्याचं समोर आलं. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.
पुतिन केवळ एक वर्षाचे पाहुणे! माजी रशियन राजकारण्याचा दावा; म्हणाले, पुढचा वाढदिवस पाहणार नाही
लोखंडी गोळा एक Buoy होता. याचा वापर समुद्रात नाविकांना गाइड करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी खूण म्हणून वापरला जातो. Buoy समुद्र किनारी सापडल्यानंतर हेलमेट आणि प्रोटेक्टिव्ह सूट घातलेल्या अधिकाऱ्यांनी परिसरात घेराव घातला होता. इतकंच काय तर लोकांना यापासून दूर ठेवण्यासाठी किनाऱ्यावर वाळूत ट्राफिक कोनही लावले होते.
लष्करासह पोलिसांनी घेतलेल्या खबरदारीमुळे या गोळ्याबाबत अनेक अफवासुद्धा पसरल्या होत्या. काहींनी हे गुप्तहेरांचे एखादे उपकरण असू शकते असंही म्हटलं. या गोळ्याचा आकार दीड मीटर इतका आहे. जपानच्या अधिकाऱ्यांना अद्याप हे समजलेलं नाही की हा गोळा कुठून आला होता.
लोखंडी गोळा फार दूरच्या अंतरावरून आला नसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र हा गोळा सापडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तात्काळ हालचाली करत समुद्र किनाऱ्यावर सर्वसामान्यांना येण्यास बंदी घातली होती. परिसरात पोलिस, सुरक्षा रक्षक आणि तटरक्षक दलाचे गार्डस तैनात केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Japan