हुगळी : प्रेम (Love) हे प्रेम असतं, प्रेमाला सीमेचं बंधन नसतं. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधील (Pakistan) एक तरुणी तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी अवैधरित्या सीमा ओलांडून भारतात पोहोचली होती. आता असा आणखी एक प्रकार घडलाय. पश्चिम बंगालमधील प्रियकराशी लग्न करण्यासाठी फ्रान्समधील तरुणी भारतात पोहोचली.
ऑनलाइन चॅटिंगमधून (Online Chatting) या दोघांना प्रेम झालं आणि आता ते साता जन्माचे सोबती झाले आहेत. या तरुणीचं नाव पॅट्रिशिया आहे, तर तरुणाचं नाव कुंतल आहे. 4 महिन्यांपूर्वी पॅट्रिशिया आणि कुंतलची एका सोशल नेटवर्किंग साईट्सवर एकमेकांची ओळख झाली. त्यानंतर ते ऑनलाइन चॅटिंगद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. मेसेजेसची देवाण-घेवाण आणि चॅटिंग करताना त्यांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागलं.
पश्चिम बंगालमधील हुगळी येथील पांडुआ भागात राहणाऱ्या कुंतल भट्टाचार्य या तरुणाचा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये राहणाऱ्या पॅट्रिशिया या तरुणीवर जीव जडला. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पॅरिसची (Paris) पॅट्रिशिया ही काली माँची खूप मोठी भक्त आहे. त्यामुळे आपण लग्न मोठ्या समारंभात किंवा गाजावाजा न करता काली माँच्या मंदिरात करू, अशी इच्छा कुंतलला बोलून दाखवली. पॅट्रिशियाने सुचवलेली कल्पना कुंतलला आवडली आणि त्याने लगेच तिने सुचवलेल्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. नंतर त्याने हुगळीच्या पांडुआ येथील प्रसिद्ध सिमलागढ काली मंदिरात पॅट्रिशियाशी लग्न केलं. हे बंगाली रितीरिवाजाप्रमाणे पार पडलं.
ऑफिसमधील मित्रमैत्रिणी लग्नाला आले नाहीत म्हणून भडकली नवरीबाई; रागात उचललं धक्कादायक पाऊल
विवाहात पॅट्रिशिया आणि कुंतल पारंपरिक बंगाली वेशामध्ये सजून मंदिरात पोहोचले आणि तिथे सर्व विधी पूर्ण केले.
लग्नात कुंतलने बंगाली कुर्ता-पायजामा घातला होता आणि पॅट्रिशियाने लाल रंगाची बंगाली साडी नेसून अग्निला साक्षी मानत कुंतलसोबत सात फेरे घेतले. यानंतर दोघांनीही हार घालून एकमेकांसोबत सात जन्म राहण्याची शपथ घेतली.
कुंतल भट्टाचार्यने सांगितलं की, दिल्लीतील एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असताना एका सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून त्याची पॅट्रिशियाशी ओळख झाली. हळुहळू ऑनलाइन चॅटिंगच्या माध्यमातून दोघांचं प्रेम वाढू लागलं.
यानंतर कुंतलने पॅट्रिशियाला लग्नाची मागणी घातली, तिने होकार दिला आणि दोघांनी लग्न करून एकत्र आयुष्य घालवायचा निर्णय घेतला. मग काय पॅट्रिशियाने कुंतलशी लग्नगाठ बांधण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिसमधून थेट दिल्ली (Delhi) गाठली. तिथून ते दोघे एकत्र कोलकाता येथे पोहोचले.
पुढचे काही दिवस दोघंही कोलकात्यात फिरले, तिथली सुंदर ठिकाणं फिरले आणि मग हुगळी जवळच्या पांडुआ येथील सिमलागढ काली मंदिरात बंगाली रितीरिवाजांनुसार विवाह केला. प्रेमाला सीमेचं आणि भाषेचं कोणतंही बंधन नसतं हेच कुंतल आणि पॅट्रिशिया यांच्या विवाहातून दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolkata, Marriage, Top trending