मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तालिबान्यांच्या लेखी महिला म्हणजे मांसाचे तुकडे; गोळीबारात जखमी महिला पोलिसाने सांगितला जीवघेणा अनुभव

तालिबान्यांच्या लेखी महिला म्हणजे मांसाचे तुकडे; गोळीबारात जखमी महिला पोलिसाने सांगितला जीवघेणा अनुभव

अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबानी बंडखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्यावरचा हल्ला इतका भयानक होता, की त्यांचे डोळे बाहेर आले होते.

अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबानी बंडखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्यावरचा हल्ला इतका भयानक होता, की त्यांचे डोळे बाहेर आले होते.

अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबानी बंडखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्यावरचा हल्ला इतका भयानक होता, की त्यांचे डोळे बाहेर आले होते.

  काबुल, 19 ऑगस्ट : 'तालिबानच्या (Taliban) दृष्टीने महिला म्हणजे जिवंत माणसं नव्हेतच. महिला म्हणजे केवळ तोडण्यासारखे मांसाचे तुकडे आहेत, असं त्यांना वाटतं...' हे बोल आहेत 33 वर्षं वयाच्या माजी महिला पोलिस अधिकारी खातेरा यांचे. अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबानी बंडखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्यावरचा हल्ला इतका भयानक होता, की त्यांचे डोळे बाहेर आले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2020पासून पती आणि लहान मुलासह त्यांचं दिल्लीत उपचारांसाठी वास्तव्य आहे. पूर्वी तालिबानी बंडखोर (Talibani Insurgent) असलेल्या त्यांच्या वडिलांनीच तिच्यावरच्या हल्ल्याचा कट रचला होता. खातेरा (Khatera) यांनी स्वतःच 'न्यूज 18'च्या पत्रकार अहोना सेनगुप्ता यांना ही माहिती दिली. सेनगुप्ता यांनी 'न्यूज 18 डॉट कॉम'वर याबद्दलचा लेख लिहिला आहे.

  खातेरा दोन महिन्यांच्या गर्भवती असताना, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तालिबानी बंडखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. कामावरून घरी येत असताना तीन तालिबान्यांनी त्यांना अडवून त्यांचं ओळखपत्र तपासलं आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या कमरेवरच्या शरीरात तब्बल आठ गोळ्या लागल्या. एवढ्यावर तालिबान्यांचं समाधान झालं नाही म्हणून त्यांनी सुऱ्यानेही असंख्य वार केले आणि त्यांचे डोळेही खोबणीतून अक्षरशः बाहेर काढले. त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यांना तिथे मरण्यासाठी सोडून ते निघून गेले.

  हे ही वाचा-Kabul Airport: ''...त्याचे हात- पायही होते गायब'', कुटुंबियांनी सांगितला अनुभव

  'तालिबानी आधी महिलांवर अत्याचार करतात. नंतर, महिलांना कशी शिक्षा केली जाते हे सर्वांना दाखवण्यासाठी शरीरांची विल्हेवाट लावली जाते. काही वेळा महिलांच्या शरीरांचे तुकडे कुत्र्यांनाही खाऊ घातले जातात. मी सुदैवी, की मी एवढ्या मोठ्या हल्ल्यातूनही बचावले. तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) महिला, मुलं आणि अल्पसंख्याकांवर नेमकं कोणतं संकट कोसळलं आहे, याचा अंदाज प्रत्यक्ष तिथे राहिल्याशिवाय कोणालाही येऊ शकत नाही,' असं खातेरा यांनी सांगितलं.

  दिल्लीच्या (Delhi) लजपतनगर भागातल्या कस्तुरबा निकेतनमध्ये अफगाणिस्तानातल्या निर्वासितांचं वास्तव्य आहे. गेल्या आठवड्यात तिथे नेहमीच्या लगबगीची जागा मोठ्या तणावाने घेतली होती. रविवारी (15 ऑगस्ट) प्रत्येक जण आपल्या मायभूमीतल्या, तालिबानच्या ताब्यात अडकलेल्या नातेवाईकांशी फोनवरून संपर्क साधण्याची धडपड करत होता.

  खातेरा यांनी सांगितलं, की 'माझ्याकडे पैसे होते, म्हणूनच मी तिथून काबूलला आणि नंतर दिल्लीला येऊ शकले. प्रत्येक जण एवढी सुदैवी नसते. महिला, तसंच तालिबानची शिस्त मोडणारं कोणीही तिथल्या रस्त्यांवरच मरण पावतं.'

  'तालिबान महिलांना (Women) पुरुष डॉक्टरांकडे जायला देत नाही. महिलांना काम करण्याची आणि शिकण्याचीही परवानगी देत नाही. मग महिलांच्या हाती राहतं काय? फक्त मरणं? आम्ही फक्त मुलं जन्माला घालणारी मशीन्स आहोत त्यांच्या लेखी. तरीही विखार आणि द्वेष काही चुकला नाहीच. अशा बंदूकधारी पुरुषांच्या हुकूमशाही कारभारात, कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय आम्ही बायकांनी मुलांना जन्माला घालायचं तरी कसं, हा साधा विचारही केला जात नाही,' असं जेव्हा आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला हातात घेऊन खातेरा सांगतात, तेव्हा त्यांची वेदना हृदयात कळ उठवून जाते.

  'गेल्या वीस वर्षांत आम्ही काय उभारलं आहे, याची कल्पना करणं जगासाठी कठीण आहे. आम्ही स्वप्नांचे इमले उभारले. आता ते जमीनदोस्त झाले आहेत. आमच्यासाठी सारं काही संपलं आहे. सरकारी संस्थेत किंवा पोलिसात काम करणाऱ्या महिलांना तालिबानची राजवट येण्यापूर्वीसुद्धा हुडकून धमकावलं जात असे. आता तर महिलांना कामच करू दिलं जाणार नाही. त्यामुळे त्या महिलांना ते जिवंत सोडणार नाहीत, अशी भीती मला वाटतेय. ते महिलांना फक्त मारून टाकत नाहीत, तर त्यांचे मृतदेह प्राण्यांना खायला घालतात. तालिबानी म्हणजे इस्लामवरचा कलंक आहेत,' असं खातेरा सांगतात.

  'गेल्या वीस वर्षांत आमच्या महिला आणि युवकांनी चांगलं शिक्षण मिळण्यासाठी, चांगली उपजीविका शोधण्यासाठी बराच पल्ला गाठला. विद्यापीठांमध्ये मुलीही दिसत होत्या. शाळेत जाणाऱ्या मुलींना पाहणं आनंददायी होतं. गेल्या एका आठवड्यात हे सगळं पाण्यात गेलं. माझ्या नातेवाईकांकडून मला असंही कळलंय, की तालिबानपासून मुलींचं संरक्षण करण्यासाठी अनेक कुटुंबांनी मुलींची शैक्षणिक सर्टिफिकेट्स जाळायलाही सुरुवात केली आहे,' असं खातेरा जेव्हा सांगतात, तेव्हा तिथली परिस्थिती किती भीषण असू शकेल, याची थोडी कल्पना आपण करू शकतो.

  बदख्शां आणि ताखर प्रांतांत जुलै महिन्यात तालिबानने स्थानिक धार्मिक नेत्यांना आदेश दिले होते, की 15 वर्षांवरच्या शिकत असलेल्या मुली आणि 45 वर्षंखालच्या विधवा यांची यादी त्यांना पुरवावी. तालिबानी बंडखोरांशी त्यांचं लग्न लावून देण्याच्या उद्देशाने ही यादी मागवण्यात आली होती.

  तालिबानने अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं, की महिलांच्या हक्कांबद्दलची (Women Rights) त्यांची भूमिका त्यांनी बदलली आहे; मात्र त्यांनी असेही संकेत दिले आहेत, की 12 वर्षांवरच्या मुलींना शिकता येणार नाही, महिलांना नोकरी करता येणार नाही, तसंच घरातल्या पुरुषाशिवाय महिलांना एकट्याने घराबाहेर पडता न येण्याचा नियम पुन्हा लागू केला जाणार आहे. आपल्याला हिंसा नको असल्याचंही तालिबानने सांगितलं आहे.

  'तालिबानच्या अत्याचारांतून वाचलेलं कोणीच त्यांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही. अफगाणिस्तान म्हणजे फक्त काबूल नव्हे. ग्रामीण भाग अक्षरशः बेचिराख केले जातील. महिलांवरच्या अत्याचारांच्या क्रूरतेला सीमाच राहणार नाही,' असंही खातेरा यांनी सांगितलं.

  'आमचा आवाज, आमच्या आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणास, आमच्या संघटना यांपैकी काहीच शिल्लक राहणार नाही. कारण महिलांना त्यांच्या घराबाहेर पडू दिलं जाणार नाही, काम करू दिलं जाणार नाही. ज्यांच्या घरात पुरुष नाही, अशांनी काय करायचं? त्यांना पोसणार कोण? 2000 सालाच्या सुमारास जन्मलेल्यांनी तर त्यांच्या कुटुंबीयांकडून तालिबान हे केवळ नावच ऐकलं आहे. आता त्यांना ते प्रत्यक्ष भोगावं लागेल. हे जिणं नरकासमान आहे,' अशी वेदना खातेरा कळकळीने मांडतात.

  खातेरा यांची पाच मुलं गझनी प्रांतातल्या त्यांच्या घरी आहेत. त्यांची त्यांना काळजी वाटतेय. कारण तालिबान्यांनी ताबा घेतल्यावर तुरुंगातल्या सगळ्या दहशतवाद्यांना मोकळं सोडलंय. 'माझ्यावर हल्ला करण्यात आला, तेव्हा पोलिसांना काही तरी करण्याचे अधिकार होते. आता तर तालिबानी उधळतीलच. त्यामुळे मुलांची काळजी वाटते. दूतावास बंद असल्यामुळे व्हिसाही (Visa) मिळणार नाही. आम्ही दोघंही (मुलांचे आई-वडील) मुलांसोबत नाही. त्यामुळे मुलं घरी नातेवाईकांसोबत आहेत. माझे वडील नक्कीच तिथे जातील. त्यांना मारहाण तरी करतील किंवा शस्त्र हाती घ्यायला भाग पाडून तालिबानमध्ये सहभागी तरी व्हायला लावतील आणि त्यांची आयुष्यं उद्ध्वस्त करतील,' असं जेव्हा खातेरा सांगतात, तेव्हा त्यांच्यातल्या आईचं तिळतिळ तुटणारं काळीज समोर दिसतं. त्यांचा सर्वांत मोठा मुलगा 15 वर्षांचा आहे.

  अफगाणिस्तानमधला नागरी हक्कविषयक कार्यकर्ता निसार याने सांगितलं, की तालिबान्यांनी तुरुंगातून सोडलेले दहशतवादी आता प्रचंड अत्याचार करतील. ते बलात्कार करतील, लुटालूट करतील आणि खूनही पाडतील. कारण आता त्यांना स्वैर संचाराची परवानगीच मिळाली आहे.

  'भारताने व्हिसा द्यायला सुरुवात केली, तर संपूर्ण अफगाणिस्तानच भारतात येईल, इतकं भीतिदायक वातावरण तिकडे आहे,' अशा शब्दांत निसारने तिथल्या परिस्थितीचं वर्णन केलं.

  शिवाय, सध्या दिल्लीत असलेल्या अफगाणी निर्वासितांचे उद्योगधंदे अफगाणिस्तानातल्या त्यांच्या नातेवाईकांवर अवलंबून असल्याने त्यांचंही काही खरं नाही, अशी भीतीही नासिरने व्यक्त केली.

  26 वर्षांचा नदीम (नाव बदललेलं आहे) पूर्वी अफगाणिस्तानात पत्रकार होता. तो सांगत होता, 'मला धोक्याचा थोडा आधीच अंदाज आला, म्हणून मी 10 महिन्यांपूर्वीच अख्ख्या कुटुंबाला घेऊन दिल्लीत पळून आलो. काबूलमधल्या एका टीव्ही चॅनेलमध्ये मी काम करत होतो. मी माध्यमात काम करत असल्याने माझ्या जिवाला धोका होता. मी बाहेर पडलो, तेव्हा काबूल सुरक्षित होतं, तरीही एकंदरीतच माध्यमात काम करणाऱ्या सर्वांच्याच जिवाला तिथे धोका आहे. आम्हाला तालिबानकडून धमक्यांचे फोन यायचे.'

  भारत अफगाणिस्तान प्रवास आणि व्हिसा यांसंदर्भात मदत करणारा व्यवसाय नदीमने दिल्लीत सुरू केला. आता तो गुंडाळून ठेवावा लागणार असं तो म्हणतो. कारण तालिबानमुळे तिथल्या प्रवासावरच निर्बंध येणार.

  तो सांगत होता, 'तालिबानच्या राजवटीत पुरुषांनी दाढी राखावीच लागते. नाही तर त्यांचा छळ केला जातो. कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत असेल किंवा कोणाचा दुरून जरी सरकारी यंत्रणेशी कामाबद्दल संबंध असेल, तर त्यांचाही छळ केला जातो. त्यामुळे तिथे कोणीच सुरक्षित नाही.'

  तालिबानचं हिंसा नको असल्याचं वक्तव्य म्हणजे निव्वळ बकवास आहे, असं तो म्हणतो.

  'तिथल्या बातम्या पाहून माझ्या आईला रडू कोसळलं. तालिबानच्या राजवटीत महिलाच नव्हेत, तर हजारा, शीख, शिया असे सगळे अल्पसंख्याकही धोक्यात आहेत. ग्रामीण भागात त्यांनी त्यांची कत्तल करायला सुरुवातही केली आहे, असं आम्हाला आमच्या तिथल्या नातेवाईकांकडून कळतं आहे,' असंही नदीमने सांगितलं.

  'ते एक तर घरं जाळतात, लुटालूट करतात किंवा दोन्ही करतात. अजिबात विरोध न होता तालिबान्यांनी इतक्या झटपट, आठवड्याभरात सगळं काबीज कसं केलं, हे आश्चर्यच आहे. आम्ही आमच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करत आहोत; मात्र ते यातून सुटतील अशी आशा ठेवण्यात काही अर्थ नाही,' असं सांगताना नदीमची अस्वस्थता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

  First published:

  Tags: Attack on police, Crime news, Taliban