नवी दिल्ली, 08 जून: भारतात अनेकदा निकृष्ट बांधकाम साहित्य वापरल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे पूल (Bridge) कोसळण्याच्या घटना घडतात. पुलाची उभारणी सुरू असतानाही अशा प्रकारच्या घटना घडल्याचं आपण ऐकतो, वाचतो. अशा घटनांमध्ये वित्तहानीसोबत जीवितहानीदेखील होते. मेक्सिकोमध्ये (Mexico) नुकतीच अशी एक घटना घडली. मॅक्सिकोतल्या क्वेर्निवाका शहरात उद्घाटन सोहळा (Opening Ceremony) सुरू असतानाच नवा कोरा पूल कोसळला (Collapse) आणि तो खोल नाल्यात पडून अनेक जण जखमी झाले. यात महापौरांसह प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून, उद्घाटनादरम्यान हा पूल कोसळल्याने या घटनेची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. 'आज तक'ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
मेक्सिकोतल्या क्वेर्निवाका शहरात (Cuernavaca City) एका नदीवर एक फूट ब्रिज (Foot Bridge) उभारण्यात आला. लाकडी फळ्या आणि धातूच्या साखळ्यांनी या फूटब्रिजची पुनर्निर्मिती करण्यात आली होती. फूटब्रिजची उभारणी पूर्ण झाल्यावर या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला शहराचे महापौर, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. उदघाटनासाठी ही सर्व मंडळी पुलावर दाखल झाली. परंतु, काही समजायच्या आतच पूल कोसळला आणि नगरसेवक, स्थानिक अधिकाऱ्यांसह दोन डझन लोक 3 मीटर (10 फूट) खोल नाल्यतल्या मोठ्या दगडांवर पडले.
फूट ब्रिजच्या साखळ्या फळ्यांपासून वेगळ्या झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, त्यातून ही घटनी कशी घडली असेल याचा अंदाज येत आहे. तसंच अनेक लोक खोल नाल्यात पडल्याचं दिसत आहे. या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचंदेखील व्हिडिओत दिसत आहे. या दुर्घटनेनंतर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं.
Mexican footbridge collapses during its inauguration by mayor. Several have been injured, none with serious injuries, reports said.#MexicoCity #MexicanFootbridge pic.twitter.com/LVsSgjVQby
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) June 8, 2022
वृत्तानुसार, या दुर्घटनेनंतर महापौर जोसे लुईस उरिओस्टेगुई (Mayor Jose Luis Uriostegui) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महापौर उरिओस्टेगुई हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. क्षमतेच्या तुलनेत जास्त लोक उद्घाटनावेळी पुलावर चढल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
मोरेलोस राज्याचे गव्हर्नर कुआहतेमोक ब्लॅंको यांनी सांगितलं, 'या दुर्घटनेमुळे नाल्यात पडलेल्यांमध्ये महापौर, त्यांची पत्नी, अनेक अधिकारी आणि पत्रकारांचा समावेश आहे. अनेक लोक यात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे'. नवा फूटब्रिज अशा पद्धतीनं कोसळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून, या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mexico