खार्किव्ह (युक्रेन), 1 मार्च : रशिया-युरोप युद्धादरम्यान नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा खार्किव्ह शहरात मृत्यू झाल्याची दुखद बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. युक्रेनमध्ये अद्यापही शेकडो भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. दरम्यान, नवीनच्या मृत्यूआधी त्याचं त्याचा जवळचा रुममेट आणि मित्र असलेल्या श्रीकांत चन्नेगौडा याच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती, असं श्रीकांतने सांगितलं. त्यानंतर दहा मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा पुन्हा नवीनला पुन्हा फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. त्यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचं श्रीकांतने रडतरडत News18 ला सांगितलं. “नवीन घराबाहेर पडला त्यावेळी आम्ही सर्वज झोपलो होतो. नवीन खाण्यासाठी काहीतरी अन्नपदार्थ घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. आम्ही खरंतर खूप भूकेलो होतो. घटनेच्या आधीच्या रात्रीदेखील आम्ही उपाशीपोटी झोपलो होतो. आम्ही अन्नासाठी घराबाहेर पडलो असतो, पण संपूर्ण शहरात पोलिसंता कर्फ्यू लावण्यात आलेला होता. आम्हाला घराबाहेर पडण्यास मनाई होती. तरीही आम्हाला काहीतरी अन्न मिळावं या आशेने नवीन घराबाहेर पडला होता”, असं नवीनचा मित्र श्रीकांत चन्नेगौडा याने सांगितलं. “मी नवीनला सकाळी आठ वाजता फोन केला. त्यावेळी त्याने आपण खाण्यासाठी काहीतरी पदार्थ घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये आल्याचं सांगितलं. त्याने मला काही पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर मी दोन हजार रुपये ट्रान्सफर केले. मी त्याला तातडीने लवकर घरी येण्यास सांगितलं. त्यानेही आपण लगेच येतो असं सांगितलं. तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं”, असं म्हणत श्रीकांत रडू लागला. “नवीन हा माझा गेल्या चार वर्षांचा सर्वात जवळता मित्र होता’, असंही श्रीकांत यावेळी रडतरडत सांगत होता. ( ‘जलद गतीने पावलं टाका’, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पवारांचा सरकारला सल्ला ) “मी दहा मिनिटांनी पुन्हा नवीनला कॉल केला. पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने फोन उचलला नाही. थोड्यावेळाने एक मगिला जी युक्रेनियन भाषा बोलते तिने फोन उचलला. ती जीवाच्या आकांताने रडत होती. मला काही कळेना. मला तिची भाषाही समजत नव्हती. मी तिथल्या एका स्थानिक व्यक्तीकडे फोन दिला जो त्या महिलेच्या भाषेला समजू शकेल. तेव्हा नवीनचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली”, असं श्रीकांतने सांगितलं. नवीन आणि श्रीकांत हे एकूण नऊ रुममेट्स होते. त्यांच्यापैकी पाचजण हे सोमवारी युक्रेनच्या पश्चिम सीमेकडे गेले आणि तिथून ते भारताच्या विमानाने मायदेशी परतले. पण नवीनसह आणखी तिघेजण हे कारणास्तव तिथेच अडकले. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडून मदत मिळेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला होता. नवीन शेखरप्पाचा हा मुळचा कर्नाटकचा होता. नवीनच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवीनने दोन दिवसांपूर्वीच आपल्या वडिलांशी व्हिडीओ कॉलवर बातचित केली होती. त्यांच्या व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवीन हा युक्रेनच्या खार्कीव्ह या शहरात वास्तव्यास होता. तिथे तो शिक्षणाच्या निमित्ताने गेला होता. खार्किव्ह हे युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. शहरात सध्या तणावपूर्वक वातावरण आहे. खार्किव्ह शहरात आज सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. नवीन अवघ्या 21 वर्षांचा होता. तो खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमुळे भारताला मोठा झटका बसला असून देशासाठी ही चिंतेची बाब आहे. या घटनेमुळे भारतातही खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.