टोकियो, 27 सप्टेंबर : प्रत्येक धर्मानुसार माणूसाच्या पार्थिवावर अंत्यविधी केला जातो. अर्थात, प्रत्येकजण शक्य तेवढा खर्च रीतीनुसार करतोच. व्यक्ती मोठी असेल आणि समाज किंवा जगाला वाट दाखवणारी असेल तर त्या व्यक्तीच्या अंत्यविधींसाठी मोठा खर्च केला जातो. जपानच्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पार्थिवावर आज (27 सप्टेंबर 22) अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फुलं वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या अंत्यविधी सोहळ्यासाठी काहीशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची 8 जुलै 2022 ला निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली होती. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी एकंदर 910 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला. या कार्यक्रमात विविध देशांचे राष्ट्रापती, पंतप्रधान सहभागी झाले होते. हा अंत्यसंस्काराचा सोहळा टोकियोच्या किटानोमारू या नॅशनल गार्डनमध्ये झाला. या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चासाठीच जपान सरकारने करदात्यांच्या पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप होतोय. तसंच टोकियोतील कोर्टातदेखील या कार्यक्रमावर बंदी आणण्याबद्दल याचिका दाखल झाली होती. सगळीकडेच या अवाजवी खर्चाबद्दल चर्चा सुरू होती. तसंच लोकंही राजकीय दुखवटा पाळण्यास तयार नव्हते. परंपरेनुसार, जपानमधील रॉयल फॅमिली आणि पंतप्रधांनांच्या अंतिम संस्कारांवर होणारा खर्च हा सरकारी खर्चातून केला जात नाही. उलट अशावेळेस त्या व्यक्तीच्या वैयक्तिक खर्चातून हा कार्यक्रम केला जातो. यासाठीच शिंजो आबेंच्या राजकीय अंत्यविधीला विरोध करण्यात आला होता. वाचा - रशियाच्या कैदेत असलेल्या सैनिकाची भयानक अवस्था; PHOTO पाहून धक्काच बसेल शिंजो आबेंच्या पार्थिवाच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेचा सगळा खर्च जपान सरकारने केला आहे. खरं तर, जपानमधील रॉयल फॅमिली आणि पंतप्रधांनांच्या अंत्ययात्रेचा खर्च हा त्या व्यक्तीचे निकटवर्तीय करतात. मध्य टोकियोतल्या किटानोमारू या नॅशनल गार्डनमध्ये आबेंच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. यासाठी जवळपास 6400 लोकांच्या सुरक्षेची तयारी केली होती. यामुळेच एकूण खर्च हा कोटींच्या घरात गेला आहे. राजकीय अंत्यसंस्काराची दुसर्या महायुद्धानंतरची दुसरी वेळ दुसर्या महायुद्धानंतर शिंजो आबे हे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांच्या अंत्यसंस्कारांवर इतक्या कोटींचा खर्च झाला आहे. या पूर्वी 1967 मध्ये राजकीय इतमामात अंत्यसस्कार झालेले शिगेरू योशिदा हे पहिले पंतप्रधान होते. जपान सरकारने सगळा खर्च देशाच्या एकूण बजेटमधून करणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. याबाबत मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाजु मात्सुनो म्हणाले, ‘एकंदर खर्चाचा अंदाज आताच वर्तवणं शक्य नाही. पण त्याबाबत काहीतरी अंदाज देणं गरजेचं आहे आणि जनतेलाही याबद्दल माहिती मिळायला हवी.’ शिंजो आबेंच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्कारासाठी जवळपास 190 पेक्षा अधिक देशांतून प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. या सगळ्या लोकांच्या स्वागतासाठी 600 दशलक्ष डॉलर खर्च होईल असं म्हटलं होतं. 100 दशलक्ष डॉलर्स हे राजकीय मिशन यात्रेसाठी आणि इतर गोष्टींसाठी खर्च होणार होते. उरलेले 1.66 कोटी दशलक्ष डॉलर्स हे प्रीफॅक्चुरल पोलिसांच्या सुरक्षेसाठी आणि ओव्हरटाईमचा खर्च यासाठी खर्च होतील. तसंच सेल्फ डिफेन्स फोर्स गार्ड ऑफ ऑनरसाठी मोठी रक्कम खर्च करण्यात येणार होती असं जपान सरकारनं आधी सांगितलं होतं. पण वास्तवात किती खर्च झाला हे पहायला लागेल. वाढत्या बजेटवर बोलताना विरोधी पक्षाचे अर्थात डेमोक्रेटिक पार्टीचे संसदीय कामकाजाच्या समितीचे अध्यक्ष जून अजुमी म्हणाले, ‘250 दशलक्ष डॉलर्स इतका खर्च होईल असं सांगितलं होतं, पण आता हा खर्च 6.6 पटीने वाढलाय. हा सगळा प्रकार म्हणजे पैशांची नासाडीच आहे.’ तसंच एका रिपोर्टनुसार असंही म्हटलंय की, 56% जपानी जनता आबेंच्या अंत्यसंस्काराचा इतका मोठा सोहळा करण्याच्या विरोधात होती तर 38% जनता ही या सोहळ्याचं समर्थन करत होती. देशाच्या नेत्याच्या अंत्यसंस्कारांसाठी किती पैसे खर्च करायचे हा ज्या-त्या देशाचा प्रश्न आहे. तरीही जनतेचा पैसा कुठे वापरावा यालाही तारतम्य असायला हवं. आता शिंजो आबेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत त्यामुळे ही चर्चा थांबेल अशी आशा करूया.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.