नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडील आपल्या 2 वर्षांच्या लहानग्याला फ्लॅटमध्ये एकट्याला ठेवून सुट्टी एन्जॉय करायला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता या जोडप्याला अटक करण्यात आली आहे. 24 वर्षीय डोनाल्ड गेकोंगे आणि डार्लिन एल्ड्रिच हे दाम्पत्य अमेरिकेतल्या दक्षिण कॅरोलिनामध्ये राहतं. अपार्टमेंटचा मॅनेजर या घटनेबद्दल बोलताना म्हणाला, की त्या बाळाच्या आई-वडिलांना अनेक वेळा फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. यानंतर पोलिसांना या घटनेबद्दल कळवण्यात आलं आणि त्यांनी येऊन मुलाला सोडवलं.
‘द मिरर’ या ब्रिटिश वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन वर्षांच्या त्या बाळाचा डायपर मलमूत्रामुळे खराब झाला होता. तसंच ते बाळ लिव्हिंग रूमच्या बेडवर झोपलेलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने बाळ सुरक्षित होतं. त्याला कोणतीही इजा झाली नव्हती. पोलिस फ्लॅटवर गेले तेव्हा ते बाळ पाण्याच्या आशेने बाटलीपाशी गेलं होतं; पण बाटलीत पाणीच नव्हतं.
हे ही वाचा : भारतीय व्यक्तीची मलेशियात कबर; 55 वर्षानंतर मुलाला Google मुळे लागला शोध
अपार्टमेंटमध्ये राहणार्या एका रहिवाशाने आपण पाहिलेल्या गोष्टीची माहिती डब्ल्यूसीबीडी टीव्हीला देताना सांगितलं, की पोलिसांनी जेव्हा फ्लॅटमध्ये प्रवेश केला, तेव्हा ते बाळ जागं झालं. पाणी पिण्यासाठी म्हणून पाण्याच्या बाटलीकडे गेलं. तपासणीसाठी या बाळाला रुग्णालयात नेण्यात आलं.
आई-वडिलांनी सांगितल्या सबबी
अपार्टमेंटच्या मॅनेजरने आई-वडिलांना असंख्य वेळा फोन केला; पण त्यांनी काही उचलला नाही. परंतु, बाळाचे वडील म्हणजे गेकोंगेने जेव्हा मॅनेजरला फोन केला, तेव्हा तो म्हणाला, की तो सकाळीच घरातून बाहेर पडला होता. तसंच घरापासून जवळच असल्याचं त्याने सांगितलं. नंतर त्याने सांगितलं, की तो कामानिमित्त न्यूयॉर्कमध्ये होते; पण बाळाची आई एल्ड्रिच बाळाची काळजी घेण्यासाठी घरी थांबली होती. परंतु, त्यानंतर डोनाल्डने पुन्हा आपल्या बोलण्यात बदल केला. तेव्हा त्याने सांगितलं, की बाळाची आईसुद्धा आपल्यासोबत न्यूयॉर्कलाच होती. यानंतर आता या जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आई-वडील आपल्या मुलांसाठी नेहमीच झटत असतात. परंतु, स्वत:च्या आनंदासाठी दोन वर्षांच्या बाळाला फ्लॅटमध्ये कोंडून ठेवणं नक्कीच चक्रावून टाकणारं आहे. पोलिस वेळेवर पोहोचले नसते, तर कदाचित अनर्थ घडू शकला असता.