सात मुलांना जन्म दिला म्हणून दाम्पत्याला 1 कोटींचा दंड

सात मुलांना जन्म दिला म्हणून दाम्पत्याला 1 कोटींचा दंड

चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी टू चाइल्ड पॉलिसी स्वीकारली असतानाही एका दाम्पत्याने सात मुलांना जन्म घातल्याने त्यांना मोठया दंडाला सामोरे जावं लागलं आहे.

  • Share this:

बिजींग, 26 फेब्रुवारी : वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनने (China) 1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसी (One Child Policy) अर्थात एका दाम्पत्याला एकच मूल हे धोरण स्वीकारलं. सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीत चीन किती कठोर आहे, याची आपल्याला कल्पना आहेच. त्यामुळे या धोरणाचं उल्लंघन करणाऱ्या दाम्पत्यांनाही मोठा दंड भरावा लागत असे. चीनच्या या धोरणामुळे लोकसंख्येवर नियंत्रण आलं असलं, तरी सामाजिक प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. वृद्धांची संख्या वाढली आणि एकंदरीत समाजाचं संतुलन बिघडलं.

या पार्श्वभूमीवर, 1979नंतर 36 वर्षांनी म्हणजेच 2015मध्ये चीनने टू चाइल्ड पॉलिसी (Two Child Policy) अर्थात दोन मुलांचं धोरण अंगीकारलं. दोनपेक्षा जास्त मुलं झाल्यास त्या दाम्पत्याला सोशल सपोर्ट फी (Social Support Fees) अर्थात सामाजिक साह्यता शुल्काच्या रूपात दंड भरावा लागतो. हा दंड किती मोठा असतो, याची कल्पना नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणावरून येईल. 'आज तक'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

अलीकडे एका चिनी जोडप्याने (Chinese Couple) तब्बल सात मुलांना जन्म दिला आणि त्याबद्दल दंड म्हणून त्यांना एक लाख 55 हजार डॉलर्स अर्थात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम सोशल सपोर्ट फी म्हणून भरावी लागली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने याबद्दलची माहिती दिली आहे. या जोडप्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ठरवून एवढ्या मुलांना जन्म दिला. तसंच, त्यांच्या पालनपोषणात काहीही कमतरता राहायला नको म्हणून आधी श्रीमंत होण्याचं उद्दिष्टही या दाम्पत्याने साध्य केलं.

34 वर्षांची उद्योजिका झँग रोंगरोंग (Zhang Rongrong) आणि तिचे 39 वर्षांचे पती या दाम्पत्याला पाच मुलगे आणि दोन मुली आहेत. त्यांनी सोशल सपोर्ट फी भरली नसती, तर त्यांच्या पाच मुलांना सरकारी कागदपत्रं मिळाली नसती.

'दी पोस्ट'शी संवाद साधताना झँग यांनी सांगितलं, की त्यांना एकटेपणाचा खूप त्रास होतो. त्यामुळे कधीही एकटं राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. पती बिझनेस ट्रिपसाठी बाहेर जायचे, तेव्हा त्यांना खूपच त्रास व्हायचा. तसंच, त्यांची मोठी मुलं शिक्षणासाठी दुसऱ्या शहरांत गेली आहेत. अशा स्थितीत लहान मुलं सोबत असल्यामुळे त्यांना एकटेपणा वाटत नाही. स्किनकेअर प्रॉडक्ट्स, ज्वेलरी, कपडे आदींचा उद्योग झँग करतात. त्यांच्या कंपन्या आग्नेय चीनमध्ये आहेत.

अवश्य वाचा -   विद्यार्थिनींसाठी फ्रान्समध्ये Menstrual Products फ्री, इतर देश कशी सांभाळतायंत याबाबची समस्या ?

आता या सात मुलांनंतर आणखी मुलांना जन्म देणार नसल्याचंही झँग यांनी सांगितलं.

चीनमध्ये मुलांच्या जन्मांवर निर्बंध असल्याने देशाचा जननदर खूपच घटला आहे. 2019मध्ये तो 1000 व्यक्तींमागे केवळ 10 जन्म एवढा कमी होता. 70 वर्षांतला हा सर्वांत कमी जननदर होता. वयाने ज्येष्ठ व्यक्तींची संख्या वाढणं आणि जन्मदर कमी होणं हे सामाजिक संरचनेच्या दृष्टीने घातक ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गेल्या वर्षीही चीनने एका दाम्पत्याचं बँक खातं गोठवलं होतं. त्या दाम्पत्याला तिसरं मूल झाल्यानंतर 45 हजार डॉलर्स अर्थात 32 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

First published: February 26, 2021, 10:48 PM IST

ताज्या बातम्या