Home /News /videsh /

जगातील सर्वोच्च शिखरावरही पोहोचला कोरोना, माउंट एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकाला लागण

जगातील सर्वोच्च शिखरावरही पोहोचला कोरोना, माउंट एव्हरेस्टवर जाणाऱ्या गिर्यारोहकाला लागण

माउंट एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याच्या उद्देशाने आलेल्या नॉर्वेतल्या एका गिर्यारोहकाला (Norwegian Climber) कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona) झाल्याचं गुरुवारी (22एप्रिल) स्पष्ट झालं.

नवी दिल्ली 23 एप्रिल: जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाने सर्वोच्च पातळी गाठली आहे. आता तो पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूवरही जाऊन पोहोचला आहे. माउंट एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याच्या उद्देशाने आलेल्या नॉर्वेतल्या एका गिर्यारोहकाला (Norwegian Climber) कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona) झाल्याचं गुरुवारी (22 एप्रिल) स्पष्ट झालं. त्यामुळे माउंट एव्हरेस्टवरच्या (Mount Everest) गिर्यारोहणाचा यंदाचा हंगाम सुरू करण्याच्या नेपाळच्या प्रयत्नांना हादरा बसला आहे. कोरोना विषाणूने कहर केल्यामुळे गेल्या वर्षीचा हंगाम वाया गेला होता. म्हणून यंदा नेपाळने क्वारंटाइनच्या नियमांमध्ये थोडी सवलत दिली होती, जेणेकरून अधिकाधिक गिर्यारोहक चढाईसाठी येऊ शकतील. गिर्यारोहकांना कोरोनाचा संसर्ग झालाच, तर त्यांच्यावर उपचार करण्यात अनेक अडचणी असूनही नेपाळने ही जोखीम पत्करली होती. अर्लेंड नेस (Erlend Ness) असं कोरोनाचा संसर्ग झालेल्या नॉर्वेच्या गिर्यारोहकाचं नाव आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने फेसबुक मेसेंजरद्वारे त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने या वृत्ताला दुजोरा दिला. आपली प्रकृती आता सुधारत असून हॉस्पिटलकडून चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे, असं अर्लेंडने सांगितलं. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर (Everest Base Camp) काही काळ घालवल्यानंतर अर्लेंड नेसला हेलिकॉप्टरने नेपाळची (Nepal) राजधानी काठमांडू (Kathmandu) येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्याला साह्य करणाऱ्या शेर्पालाही कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. 'हिमशिखरांमध्ये अन्य कोणालाही कोरोनाची लागण होऊ नये असं मला वाटतं. आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचावर असताना लोकांना हेलिकॉप्टरनेही सुरक्षितस्थळी नेणं अवघड आहे,' असं नेसने एनआरके या नॉर्वेतल्या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. उंच शिखरांवर ऑक्सिजनचं प्रमाण विरळ असल्यामुळे श्वास घेणं अवघडच असतं. त्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर श्वसन यंत्रणेवरच परिणाम होतो. त्यामुळे एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास आरोग्याला मोठा धोका उद्धवू शकतो. 'लवकरात लवकर चढाई करून उंचावर जायचं असं माझं नियोजन होतं, जेणेकरून मला संसर्ग होऊ शकणार नाही; मात्र मी कमनशिबी ठरलो. माझ्याकडून स्वच्छतेची काळजी आणखी काटेकोरपणे घेतली जायला हवी होती,' असं नेसने एनआरकेशी बोलताना सांगितलं. माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी आलेल्या काही गिर्यारोहकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना काठमांडूतल्या सिवेक हॉस्पिटलमध्ये (CIWEC Hospital)दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला हॉस्पिटलकडून दुजोरा देण्यात आला; मात्र त्यांच्या संख्येबद्दलची माहिती देण्यात आली नाही. 'मी याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही; मात्र एव्हरेस्टवरून सुरक्षितस्थळी आणण्यात आलेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे,' असं सिवेक हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर प्रविता पांडे यांनी एएफपीला सांगितलं. दरम्यान,नेपाळच्या पर्यटन विभागाच्या प्रवक्त्या मीरा आचार्य यांनी मात्र गिर्यारोहकांपैकी कोणाला कोविडची लागण झाल्याचं वृत्त आपल्याकडे आलं नसल्याचं सांगितलं. '15 एप्रिल रोजी एका व्यक्तीला एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून खाली आणण्यात आलं; मात्र त्याला न्यूमोनिया झाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. तसंच, त्याच्यावर विलगीकरणात उपचार होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती,' असं आचार्य यांनी सांगितलं. एव्हरेस्ट बेस कॅम्पवरचे सगळे चिंतेत आहेत, असं एशियन ट्रेकिंगचे दावा स्टीव्हन शेर्पा यांनी सांगितलं. नेपाळने यंदा माउंट एव्हरेस्टवर (Mount Everest)चढाई करण्यासाठी 377 जणांना परवाने दिले आहेत. हा आकडा लवकरच 2019 मधल्या 381 च्या वर जाईल, असा अंदाजआहे. नेपाळमध्ये अनेक परदेशी गिर्यारोहक आले असून एव्हरेस्टच्या पायथ्याशी आणि काही शिखरांवर गिर्यारोहकांना साह्य करणाऱ्या टीमची गर्दी वाढत आहे. अलीकडच्या काळात एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मोठी गर्दी होऊन अनेकजणांचा मृत्यूही होत आहे. 2019मध्ये इथे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चौघांचा मृत्यू अति गर्दीमुळे झाल्याचं सांगण्यात येतं. नेपाळच्या दक्षिणेकडून आणि तिबेटच्या उत्तरेकडून एका दिवशी तब्बल 354 जण एव्हरेस्टवर पोहोचण्यासाठी चक्क रांगेत होते. गर्दी टाळण्यासाठी नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने योग्य काळात चढाईसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घातली. मोहिमा आयोजित करणाऱ्यांना अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे, की त्यांनी त्यांच्या टीम्स परमिट नंबर्सनुसारच वर सोडाव्यात किंवा एकाचवेळी चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांच्यासंख्येवर तरी मर्यादा आणावी. 'मोहिमांच्या आयोजकांशी, तसंच अन्य संबंधित घटकांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला होता,' असं मीरा आचार्य(Mira Acharya) यांनी सांगितलं.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19, World After Corona

पुढील बातम्या