नवी दिल्ली, 27 डिसेंबर: गेल्या दीड वर्षांपासून सगळ्या जगाला वेठीला धरलेल्या कोरोना विषाणूचे (Coronavirus) नवनवीन प्रकार सतत सापडत असल्यानं या संकटाचं सावट कायम आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराची दहशत पसरली असून युरोपातील (Europe) अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाची नवी लाट आली आहे. ओमिक्रॉन (Omicron) पाठोपाठ डेल्मिक्रॉन (Delmicron) हा आणखी एक प्रकार उद्भवण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार निर्माण होण्याचे सत्र कायम राहणार असल्यानं सातत्यानं याबाबत संशोधन सुरू आहे. अशाच एका संशोधनातून एक धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. अमेरिकेतील (USA) ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीत (Ohio State University) करण्यात आलेल्या एका अभ्यासात, हरणांमुळे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराची लागण होण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
अनेक प्राणी विषाणूसाठी वस्तीस्थान ठरू शकतात आणि या विषाणूचे अनेक धोकादायक प्रकार निर्माण होऊ शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधील संशोधन अहवालाचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर अँड्र्यू बोमन यांच्या मते, या आणि इतर अभ्यासांतून मिळालेल्या पुराव्यांवरून आम्ही हा निष्कर्ष नोंदवला आहे. या अभ्यासानुसार, जंगलातील हरणं या विषाणूने संक्रमित झाली असून, हरणांमध्ये त्याचा प्रसार वाढण्याची शक्यता अधिक आहे.
कोरोनाचा विषाणू हरणांच्या शरीराच्या आतच राहिला तर त्याच्यामध्ये अनेक नवीन बदल घडू शकतात आणि एक नवीन प्रकार तयार होऊ शकतो. त्याचा माणसांमध्ये झपाट्यानं संसर्ग होऊ शकतो. आतापर्यंत हरणांमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे कोरोना विषाणू आढळले असून, प्राण्यांच्या 360 नमुन्यांपैकी एक तृतीयांश नमुन्यांमध्ये हे तीन प्रकारचे विषाणू आढळून आले आहेत. वेगवेगळ्या सहा ठिकाणी ते सापडले आहेत.
या संशोधनासाठी जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान हरणांचे नमुने घेण्यात आले. या दरम्यान डेल्टा व्हेरियंट किंवा इतर कोणतेही प्रकार समोर आले नाहीत. मात्र जीनोम सिक्वेन्सिंग (Genom-Sequencing) केल्यानंतर धक्कादायक परिणाम समोर आले आहेत.
मोठी बातमी: लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीची तारीख ठरली
हरणांमध्ये आढळणारे विषाणूचे प्रकार स्थानिक कोविड रूग्णांमध्ये आढळणाऱ्या विषाणू प्रकारांसारखेच होते. आता हा विषाणू जंगली हरणांमध्ये आल्याचे स्पष्ट झाले असले तरी हरणाला संसर्ग कसा झाला किंवा प्राण्यांच्या शरीरात हा विषाणू कसा राहतो, हे अद्याप कळू शकलेले नाही. हरणांमध्ये या विषाणूच्या संसर्गाचा प्रसार 13.5 ते 70 टक्क्यांपर्यंत आहे. प्रोफेसर बोमन म्हणाले की, हरणांमध्ये विषाणू असल्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे हरणांमध्ये विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे, एक नवीन प्रकार माणसांसह इतर प्राण्यांमध्येही पसरू शकतो आणि दुसरे म्हणजे हरणांमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी माणसांमधील प्रतिकारशक्ती सक्षम नसेल.
हरणांमधून माणसाला नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढल्यानं सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा हा धोका कधी संपणार याची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत असतानाच नवनवीन विषाणू प्रकारांमुळे चिंता वाढत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus cases, Covid-19