Home /News /videsh /

वुहानमध्ये नेमकं काय घडलं होतं? चीनच्या प्रमुख डॉक्टरांनी केला सर्वात मोठा खुलासा

वुहानमध्ये नेमकं काय घडलं होतं? चीनच्या प्रमुख डॉक्टरांनी केला सर्वात मोठा खुलासा

चीनच्या वुहानमधूनच (Wuhan) कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा अमेरिकेपासून जवळजवळ सर्वच देशांनी केला आहे. या आरोपाचे खंडन चीनने वेळोवेळी केले खरे, मात्र आता चीनमधील एका प्रमुख डॉक्टरांनीच त्यांची पोलखोल केली आहे.

    बीजिंग, 28 जुलै : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे (Coronavirus) मुळ शोधण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना (WHO) सध्या करत आहे. मात्र चीनच्या वुहानमधूनच (Wuhan) कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा अमेरिकेपासून जवळजवळ सर्वच देशांनी केला आहे. या आरोपाचे खंडन चीनने वेळोवेळी केले खरे, मात्र आता चीनमधील एका प्रमुख डॉक्टरांनीच त्यांची पोलखोल केली आहे. चीनच्या एका प्रमुख डॉक्टरांनी कोरोनासंदर्भात मोठा दावा केला आहे. BBCशी बोलताना प्रोफेसर क्वोक यंग युएन यांनी सांगितले की, "कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर काही स्थानिक अधिकाऱ्यांनी या आजाराचे प्रमाण लपवले".  वुहानमधील कोरोनाचे परीक्षण करणारे डॉक्टर क्वोक यंग यांनी या अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे नष्ट केले असल्याचेही म्हटले आहे. तसेच, सुरुवातीच्या काळात क्लिनिकमध्ये तपासणीचा वेग खूपच कमी होता. मुख्य म्हणजे नोव्हेंबरमध्ये वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. कोरोनाचा प्रसार तेथील मांसबाजारामुळे झाल्याचे बोलले जात आहे. वाचा-शास्त्रज्ञांना सर्वात मोठं यश, कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडली याबाबत सांगताना क्वोक म्हणाले की, जेव्हा आम्ही हुआनान (Huanan) सुपरमार्केटमध्ये गेलो, तेव्हा तेथे काहीच आढळून आले नाही, कारण आम्ही जाण्याआधीच बाजारपेठ स्वच्छ करण्यात आली होती. म्हणून आपण असे म्हणू शकता की क्राइम सीनला त्यांनी तपासाआधीच बदलले. सुपरमार्केटमध्ये केलेल्या साफसफाईमुळे सर्व पुरावे नष्ट झाले, त्यामुळे आम्हाला अशी कोणतीच गोष्ट सापडली नाही, ज्याने हे सिद्ध होईल की कोरोनाचा प्रसार येथूनच झाला. क्वोक यांनी असेही सांगितले की, "मला अशी शंका आहे की, कोरोनाबाबत माहिती लपवण्यासाठी त्यांनी काही तरी केले आहे". मुख्य म्हणजे कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर हुआनान सुपरमार्केट बंद करण्यात आले होते. मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. वाचा-जगात 6 आठवड्यात Corona रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, WHO ने बोलावली आणीबाणीची बैठक क्वोक म्हणाले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती पुढे पाठवायची होती मात्र त्यांनी हे काम व्यवस्थित होऊ दिले नाही. असे असले तरी, चीनने आरोप अधिकृतपणे नाकारले आहेत. आतापर्यंत जगातील कोरोनाबाधितांची संख्या 1.66 कोटी झाली आहे. तर 6.56 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आताही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. एकट्या अमेरिकेत 44 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दीड लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे, अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या