जकार्ता, 21 जुलै: एका कोरोनाबाधित तरुणानं (Corona positive man) तातडीनं घरी पोहोचण्यासाठी शेकडो लोकांचा जीव टांगणीला लावल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुण कोरोनाबाधित असूनही त्यानं आपल्या बायकोचा बुरखा परिधान करून विमान प्रवास केला आहे. पण त्याच्या एक चुकीमुळे त्याचं पितळ उघडं पडलं आहे. संबंधित कोरोनाबाधित तरुण बुरखा घालून विमानतळावर तर पोहोचला पण शेवटी केलेल्या एका चुकीमुळे त्याचं बिंग फुटलं आहे. विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कोरोना चाचणी केली असता, तो पुन्हा कोरोना बाधित आढळला आहे.
CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित तरुणाचं नाव DW असून तो इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील रहिवासी आहे. दरम्यान त्यानं कोरोना नियमांचं उल्लंघन करत विमान प्रवास केला आहे. यासाठी DW ने शेकडो लोकांचा जीव धोक्यात घातला होता. आरोपीनं बुरखा परिधान करत आपल्या बायकोचा नकारात्मक रिपोर्ट घेऊन जकार्ता विमानतळावर गेला. याठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांना गंडवण्यात त्याला यशही आलं पण विमानात बसल्यानंतर त्यानं एक चूक की ज्यामुळे त्याचा हा बनाव उघडकीस आला आहे.
हेही वाचा-याने नादच केला थेट, विजेच्या खांबावर उभं राहून पुराच्या पाण्यात माकड उडी, VIDEO
जकार्ता विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना चुकवून विमानात बसल्यानंतर, आरोपी तरुण काही वेळानं टॉयलेटमध्ये गेला. याठिकाणी त्यानं बुरखा उतरवून, पुरुषाचे कपडे परिधान केले आणि आपल्या सीटवर जाऊन बसला. पण ही बाब विमानातील एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. यामुळे तिने या घटनेची माहिती वैमानिकांना दिली. वैमानिकांनी या घटनेबाबत टरनेट विमानतळावरील अधिकाऱ्यांना सतर्क केलं.
हेही वाचा-21 वर्षांचा होईपर्यंत माहितीच नव्हतं की त्याची मोठी बहीण खरंतर आहे त्याची आई!
विमान जसं टरनेट विमानतळावर पोहोचलं, तेव्हा विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी DW ला ताब्यात घेतलं. अधिकाऱ्यांनी विमानतळावरच आरोपीची कोरोना चाचणी केली. या चाचणीतही आरोपी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. संबंधित आरोपी कोरोना बाधित आढळल्यानं अधिकाऱ्यांनी आरोपीला त्याच्या घरीच विलगीकरणात ठेवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.