नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : कोरोनाचं संकट अद्याप कमी झालेलं नाही. जगभरामध्ये कोरोनाचा (Coronavirus) प्रसार अजूनही सुरुच आहे. लसीकरणादरम्यान(Vaccination) ब्रिटनमध्ये (Britain)कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona New Strain) आढळून आला आहे. त्यामुळे, जगभरातील देशांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. अशामध्ये ब्रिटनमधील एका महिलेला स्वतःला कोरोनाची लागण झाली असल्याचं वाटलं. पण ती कोरोनानं नाही तर दुसऱ्याच आजाराने ग्रस्त असल्याचं नंतर समोर आलं. या आजारामुळे तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.
चेर लिटिल (Cher Little) असं या महिलेचं नाव आहे. ताप आणि डोकेदुखी होत असल्यानं तिनं कोविड-19 ची टेस्ट (Covid-19 Test) करण्यासाठी बुकिंग केलं. पण 46 वर्षांच्या चेरच्या चेहऱ्यावर फोड येऊ लागले आणि तिची त्वचा काळी पडू लागली. अशामध्ये ताबडतोब तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी तिला ‘मेनिंगोकोकल सेप्टिसीमिया’ (Meningococcal Septicaemia) आजार झाल्याचं सांगितलं.
शरीरावर फोड आणि त्वचा पडली काळी -
डॉक्टरांनी सांगितलं की, 'चेर लिटीलचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला तिचे दोन्ही पाय कापावे लागले. सिस्टर सायन लॉयडनं सांगितलं की, 'चेरला आपत्कालीन विभागामध्ये ठेवण्यात आलं, तोपर्यंत तिच्या डोक्यापासून ते पायापर्यंतची सर्व त्वचा काळी पडली होती. संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि त्यामधून रक्त येत होतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच चेर कोमात गेली. तिच्या शरीरातील बऱ्याच अवयवांनी काम करणं थांबवलं. अशामध्ये आम्हाला वाटलं तिचा लवकरच मृत्यू होईल. पण सर्व डॉक्टर तिचा जीव वाचण्याचा प्रयत्न करत होते.
कोमातून बाहेर निघाली पण कोरोना झाला -
‘मेनिंगोकोकल सेप्टिसीमिया’ आजारामुळे चेरचा जीव वाचण्याची फक्त 20 टक्के शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. चेरने तीन आठवडे मृत्यूशी झुंज दिली. लॉयड यांनी सांगितलं की, ही अतिशय भयानक वेळ होती. प्रत्येक वेळी डॉक्टर चेरला कोमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. तीन आठवड्यांनंतर चेर कोमातून बाहेर आली आणि तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं. त्यानंतर ती स्वत:हून श्वास घेऊ लागली. पण त्यावेळी तिच्यावर आणखी एक संकट आलं. चेरला कोरोनाची लागण झाली.
हात वाचवले पण पाय कापावे लागले -
सिस्टर लॉयड यांनी पुढं सांगितलं की, आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की, कोमामध्ये असल्यामुळे चेरच्या रक्ताचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे तिच्या हात आणि पायांना नुकसान होण्याची शक्यता आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर फोड आले होते. डॉक्टरांनी प्रयत्न करुन तिचे हात कापण्यापासून वाचवले. पण तिच्या पायांनी काम करणं बंद केल्यामुळे डॉक्टरांनी तिचे पाय कापण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी तिचे दोन्ही पाय कापले. सिस्टरने पुढं सांगितलं की, चेरला ताबडतोब रुग्णालयात आणलं नसतं तर तिचा मृत्यू झाला असता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Disease symptoms