मागील अनेक वर्षांपासून आपल्याला जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) धोका दिसत आहे. विविध गोष्टींवर याचा परिणाम होत आहे. परंतु अजूनपर्यंत जगभरातील अनेक देशांनी यातून धडा घेतलेला नसून भविष्यात आपल्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अनेक वैज्ञानिकांनी देखील यासंबंधी आपल्याला इशारा दिला असून अनेकठिकाणी याचे परिणाम दिसून येत आहेत. नासाने(NASA) नुकतेच काही फोटो शेअर केले असून यामध्ये जागतिक तापमानवाढीचा विविध गोष्टींवर कसा परिणाम होत आहे हे दिसून येत आहे. आज आपण याच संबंधी काही फोटो पाहणार आहोत.(फोटो: सोशल मीडिया)
आर्कटिक महासागर- आर्क्टिक महासागरात थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बर्फ जमा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात याठिकाणी असणारा बर्फ वितळतो. 1979 पासून याठिकाणी असणाऱ्या बर्फाची पातळी नोंदवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 1984 मध्ये या ठिकाणी उन्हाळ्यात सर्वात कमी बर्फाची नोंद झाली. यानंतर 2012 मध्ये 1984 पेक्षाही कमी पातळीची नोंद झाली. त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या बर्फाची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. 2007 नंतर उन्हाळ्याच्या दिवसात बर्फाचा स्तर कमी होतो आहे. 2016 मध्ये हा स्तर सर्वात कमी होता. (फोटो: boredpanda.com)
सहारा वाळवंटात हिमवर्षाव- सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची कल्पना देखील कुणी करू शकत नाही. पण बदलत्या तापमानामुळे 2016 ला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती. नासाच्या या फोटोत आपल्याला बर्फवृष्टी झाल्यानंतर आणि बर्फ वितळल्यानंतरची स्थिती दिसून येत आहे. भयंकर तापमान असून देखील या ठिकाणी झालेली बर्फवृष्टी दीर्घकाळ याठिकाणी होती.(फोटो: boredpanda.com)
अरल सागर- 1960 पर्यंत अरल सागर जगातील चौथा सर्वात मोठा तलाव होता. त्या काळात सोव्हिएत रशियाने शेतीच्या पाण्यासाठी या नद्यांची दिशा बदलली. 2000 मध्ये पूर्व आणि पश्चिम बाजूला उत्तर अरल समुद्र आणि दक्षिण अरल समुद्र विभागला गेला. 2005 मध्ये याठिकाणी बांधण्यात आलेल्या धरणामुळे उत्तरेकडील पाणी कमी झाल्याने हळूहळू हा तलाव कोरडा पडत गेला. या फोटोमध्ये आपण 2016 आणि 2017 मधील फरक पाहू शकतो.(फोटो: boredpanda.com)
पोपो तलाव- या फोटोमध्ये आपण पाण्याची पातळी कमी होत असलेली दिसून येत आहे. बोलिव्हियाच्या या तलावातील पाण्याची पातळी मागली काही वर्षांपासून कमी होत आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी मासेमारी करण्याचे हे एकमेव ठिकाण आहे. खोदकामामुळे आणि पाण्याचा मार्ग बदलल्याने या ठिकाणी पाण्याच्या पातळीत घट होत आहे. 1994 मध्ये हा तलाव सुकला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा तलाव सुकताना दिसून येत आहे. (फोटो: boredpanda.com)
न्यूझीलंडमध्ये छोटे होत जाणारे ग्लेशिअर - न्यूझीलंडमध्ये मोठ्या प्रमाणात ग्लेशिअर आहेत. परंतु ते 1890 सालापासून घटत आहेत. या देशात 3 हजार ग्लेशिअर असून बदलत्या तापमानामुळे हे ग्लेशिअर नष्ट होत आहेत. 2007 मध्ये वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले की, ग्लोबर वॉर्मिंगमुळे हे ग्लेशियर नष्ट होत आहेत. 1990 ते 2017 या काळात कमी होत गेलेली ग्लेशिअरची संख्या या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. (फोटो: boredpanda.com)
अंटार्टिकामध्ये पाण्याचा वाढता स्तर - तापमानवाढीमुळे अंटार्टिकामधील हिमनगांना मोठा धोका निर्माण झाला आहे. हे हिमनग मोठ्या प्रमाणात वितळत असून यामुळे येथील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. या फोटोमध्ये आपल्याला निळ्या भागामध्ये वाढते पाणी दिसून येत आहे.त्याचबरोबर 2 वर्षांमधील पाण्याचा वाढलेला स्तर देखील दिसून येत आहे. (फोटो: boredpanda.com)
नष्ट होणारे बेट- अमेरिकेतील हवाई बेटांच्या या दोन फोटोंमध्ये आपल्याला कमी होत गेलेल्या हवाई बेटांचे अंतर दिसून येत आहे. पहिल्या फोटोमध्ये सप्टेंबर 2018 मधील बेट दिसून येत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये मागीलवर्षी ऑक्टोबर महिन्यात आलेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात ही बेटे नष्ट झाली आहेत. 11 एकरवरील या बेटांवरील माती हवेबरोबर उडून गेल्याने ही बेटे नष्ट झाली आहेत.(फोटो: boredpanda.com)
पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात महापूर - 2017 मधील मार्च महिन्यात पेरूमध्ये आलेल्या या महापुरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. पेरूमधील दोन नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा महापुरात आला होता. या महापुरात वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती. यामध्ये 70 हजार नागरिक बेघर होण्याबरोबरच 60 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचबरोबर 7500 किलोमीटर रस्ते आणि अनेक पुलांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या फोटोमध्ये आपल्याला 2016 आणि 2017 मधील नदीच्या पाण्याच्या पातळीमधील फरक दिसून येत आहे. (फोटो: boredpanda.com)