नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : कोरोनाचं (covid 19) संकट आल्याने जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोनावर जेव्हा चर्चा सुरू असते, तेव्हा चीन (China) देशाचा उल्लेख येतोच. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळला होता. इतर देशांप्रमाणे चीनच्या अर्थव्यवस्थेवरदेखील कोरोनामुळे परिणाम झाला. ते संकट ओसरतंय तोपर्यंत आता चीनच्या ईशान्य भागात असं संकट उभं राहिलं आहे, की ज्यामुळे अनेक कंपन्यांना त्यांचं उत्पादन थांबवावं लागत आहे. हे संकट विजेच्या तुटवड्याचं (China Power Crisis) आहे. कोळशाच्या पुरवठ्यात (Supply of coal) येणाऱ्या अडचणींमुळे हे संकट ओढवलं आहे.
चीनच्या ईशान्य भागातलं वीज संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विजेचा पुरवठा मागणीपेक्षा कमी होत असल्याने अनेक ठिकाणी कारखाने, मॉल्स, दुकानं बंद करावी लागत आहेत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकदेखील हैराण झाले आहेत. कोळशाच्या पुरवठ्यातल्या अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून हे संकट निर्माण झालं आहे. चीनमध्ये उत्पादकांकडून कोळशाची मागणी वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम कोळशाच्या पुरवठ्यावर झाला आहे. कोळशाच्या किमतीही लक्षणीय वाढल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून विजेचं संकट निर्माण झालं आहे. यामुळे Apple, टेस्ला यांसारख्या कंपन्यांच्या कारखान्यांतलं उत्पादनही थांबवावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात चांगचुन परिसरात विजेसाठी वेळ निश्चित करण्यात आली होती. घरांना आणि कारखान्यांना समान वीज मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एका ठराविक वेळेतच विद्युत पुरवठा करण्यात येत होता. प्रत्यक्षात मात्र वीजपुरवठा बराच काळ खंडित होत असल्याचं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, विजेची जेवढी मागणी आहे, तेवढा पुरवठा करता येत नसल्याने कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे आता विविध कंपन्यांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ लागला असून, चीनसाठी हे मोठंच संकट ठरलं आहे.
जास्त वीज लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरू नका, असं या प्रदेशातल्या हुलुदाओ (Huludao) भागातल्या नागरिकांना सांगण्यात आलं आहे. पाणी गरम करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. स्थानिक माध्यमांमधल्या वृत्तांनुसार, चीनमध्ये विजेचं संकट आगामी काळातही कायम राहू शकतं.
कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था अगोदरच संकटात आहे. त्यातच आता विजेचं संकट उद्भवलं आहे. त्यामुळे चीनसमोरचं संकट वाढत आहे. सुमारे 15 चिनी कंपन्यांनी त्यांचं उत्पादन बंद केल्याची माहिती दिली आहे. तैवानच्या 30 लिस्टेड कंपन्यांनीही वीज संकटामुळे उत्पादन थांबल्याचं सांगितलं आहे. ज्या भागात विजेचं संकट निर्माण झालं आहे, त्या भागात हिवाळासुद्धा तीव्र असतो. त्यामुळे हिवाळ्यात नागरिकांना विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचं आव्हान प्रशासनासमोर असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China