माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. मंगळवारी वेगवेगळ्या शहरातील शॉपिंग मॉल्समध्ये लूटमार आणि जाळपोळ सुरू झाली. आतापर्यंत 72 हून अधिक लोक ठार झाले आहेत.
लूटमार आणि हिंसाचाराची सुरुवात शुक्रवारी झाली होती. जोहान्सबर्ग शहरापासून हे सुरू झालं. हे थांबविण्यासाठी 2500 सैनिक तैनात केले आहेत.
दक्षिण आफ्रिका पोलिसांनी मंगळवारी सांगितलं की आतापर्यंत 1234 दंगलखोर लोकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
मंगळवारी जोहान्सबर्गच्या अलेक्झांड्रा टाउनशिपमधील शॉपिंग मॉलमध्ये शेकडो लोकांनी लूटमार केली. लूटमार करताना एका व्यक्तीने एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले "मला झुमाबद्दल जराही काळजी वाटत नाही, तो एक भ्रष्ट म्हातारा आहे, तो तुरुंगात गेला ते चांगलंच झालं. मी माझ्या आईसाठी सामान घेऊन चाललो आहे."
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वीच झुमाने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं.