लंडन, 10 मार्च : ब्रिटनच्या राजघराण्याचे राजपूत्र प्रिन्स हॅरी
(Prince Harry) आणि त्यांची बायको मेगन मार्केल
(Meghan Markle) यांनी एका मुलाखतीमध्ये राजघराण्याची अनेक गुपितं उघड केली आहेत. या मुलाखतीमुळे जगभर खळबळ उडाली होती. अखेर या विषयावर ब्रिटनच्या राजघराण्यानं (Buckingham Palace) या विषयावर मौन तोडलं आहे. या मुलाखतीमध्ये करण्यात आलेल्या खुलाशांबाबत दु:खी असल्याचं मत राजघराण्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. प्रसिद्ध टीव्ही अमेरिकन होस्ट ओपरा विन्फ्रे
(Oprah Winfrey) यांना हॅरी आणि मार्केल यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये आपल्या होणाऱ्या बाळाच्या वर्णाबाबत राजघराण्याला चिंता होती, असा दावा मार्केल यांनी केला होता.
बर्मिंगहॅम पॅलेसच्या वतीनं या विषयावर एक वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. 'हॅरी आणि मेगन यांच्यासाठी मागील काही वर्ष अत्यंत आव्हानात्मक होती, हे समजल्यानंतर संपूर्ण परिवार दु:खी आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यामधील वर्णभेदाचा मुद्दा हा गंभीर आहे. काही आठवणींंमध्ये फरक असू शकतो मात्र त्या सर्व मुद्यांची अत्यंत गांभीर्यानं नोंद घेण्यात आली आहे. त्यांची परिवाराकडून खासगीमध्ये समजूत काढली जाईल. हॅरी, मेगन आणि आर्ची हे हे नेहमीच परिवाराचे प्रिय सदस्य असतील.' असे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
काय होते आरोप?
मेगन मार्केल यांनी मुलाखतीमध्ये दावा केला होता की, ' आमच्या मुलाचा रंग कसा असेल याची शाही परिवाराला चिंता होती. आपला मुलगा आर्चीच्या त्वचेचा रंग काळा असेल अशी भीती या परिवाराला होती. त्यामुळे मुलाला ते प्रिन्स घोषित करण्यास तयार नव्हते. शाही परिवारासोबत राहत असताना आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, असा धक्कादायक गौप्यस्फोट मेगन यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे. “मी शाही परिवारावर विश्वास ठेवला ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला एकटेपणा जाणवत होता. माझ्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. मला मित्रांसोबत लंचसाठी बाहेर जाण्याची परवानगी देखील नव्हती,’ असे त्यांनी सांगितले होते.
(हे वाचा : कोण आहेत फ्लाईंग शीख? त्यांचे ब्रिटनमधील स्मारक अंतिम टप्प्यात; इतिहास वाचून रोमांचित व्हाल )
या मुलाखतीनंतर घेण्यात आलेल्या एका चाचणीमध्ये 32 टक्के लोकांनी हॅरी आणि मेगन यांच्याबद्दल चुकीचं झालं असं मत व्यक्त केले होते. तर साधारण तेवढ्याच लोकांनी या विषयावर राजघराण्याच्या बाजूनं मत व्यक्त केले होते. या मुलाखतीमध्ये मेगन यांनी केलेल्या आरोपानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राजघराण्यावर दबाव वाढला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.