लंडन, 21 मे: हवामान बदल किंवा नैसर्गिक कारणांमुळे बर्फाळ प्रदेशातील एकूण स्थितीवर विपरित परिणाम होत असून, हिमनग तुटून पडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जगभरातील पर्यावरणप्रेमी,अभ्यासक आणि वैज्ञानिक यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. बर्फाची खाण समजल्या जाणाऱ्या अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) तुटून विखरु लागला आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जातो. हा हिमनग 170 किलोमीटर लांब आणि सुमारे 25 किलोमीटर रुंद आहे. अंटार्क्टिकामधील पश्चिम भागातील रोन्ने आईस सेल्फमध्ये असणारा हा महाकाय हिमनग तुटताना युरोपीय स्पेस एजन्सीच्या (European Space Agency) उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये दिसून आला आहे. हा हिमनग तुटल्याने जगभरात दहशतीचं वातावरण आहे. हा हिमनग तुटल्यानंतर तो वेड्डेल समुद्रात स्वतंत्रपणे तरंगत आहे. या महाकाय हिमनगाचा पूर्ण आकार 4320 किलोमीटर आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जात असून त्याला ए-76 असं नाव देण्यात आलं आहे. हा हिमनग तुटल्याची छायाचित्रे युरोपियन युनियनच्या कोपरनिकस सेंटीनल या उपग्रहाने (Satellite) काढलेली आहेत. हा उपग्रह जमिनीवरील धुव्रीय प्रदेशांवर लक्ष ठेवतो. ब्रिटनच्या अंटार्क्टिक सर्व्हे दलाने सर्वप्रथम हा हिमनग तुटून पडल्याचे जाहीर केले होते. हे वाचा- चीनच्या झुरोंग रोव्हरचं मंगळावरील काम सुरू, पाठवला पृष्ठभागाचा पहिला PHOTO नॅशनल स्नो अँड आईस डेटा सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा हिमनग तुटल्याने किंवा स्खलन झाल्याने थेट समुद्रातील पाणीपातळी वाढणार नाही. परंतु,अप्रत्यक्षपणे पाणीपातळीत नक्की वाढ होऊ शकते. तसेच यामुळे हिमनगांचा वेग आणि बर्फाचा प्रवाह कमी होऊ शकतो. अंटार्क्टिकातील भूभाग हा पृथ्वीवरील अन्य भुभागांच्या तुलनेत वेगाने तप्त होत असल्याचा इशारा या सेंटरनं दिला आहे. अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या स्वरुपात इतके पाणी साठलेले आहे की हा बर्फ जर वितळला तर जगभरातील समुद्रामधील पाणीपातळी (Water Level) 200 फुटांपर्यंत वाढू शकते. हे वाचा- उडत्या तबकड्या म्हणजे काय?अमेरिकेत आहेत याबाबत व्हिडीओ-पुरावे;बराक ओबामांचा दावा वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, ए-76 हा हिमनग हा हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे तुटला आहे. ए-76 आणि ए-74 हे दोन्ही हिमनग त्यांचा कालावधी संपल्यानं नैसर्गिक कारणांमुळे तुटले आहेत,असे ट्वीट ब्रिटीश अंटार्क्टिक सर्व्हे ग्रुपच्या वैज्ञानिक लॉरा गेरीश यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की हिमनगांच्या स्खलनाकडे लक्षं देणं आवश्यक असलं तरी इतक्या लवकर त्याचं स्खलन होणं अपेक्षित नाही. नेचर या वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, 1880 नंतर समुद्रांमधील पाणी पातळीत सरासरी 9 इंचांनी वाढ झाली आहे. यापैकी एक तृतीयांश पाणी हे ग्रीनलॅण्ड (Greenland) आणि अंटार्क्टिका येथील बर्फ वितळल्याने आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.