वॉशिंग्टन, 20 फेब्रुवारी: अमेरिका (America) आणि सौदी अरेबिया (Saudi Arabia) या दोन देशांत खशोगी हत्याप्रकरणामुळे (Jamal Khashoggi Murder) तणाव वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. वॉशिंग्टन पोस्टचे (Washington post journalist) वरिष्ठ पत्रकार जमाल खशोगी यांची 2018 साली निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती. या हत्येमागे सौदी अरेबिया प्रशासन (Saudi Govt) असल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त केला जात होता. पण आता खशोगी हत्या प्रकरणात सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Prince Mohammed bin salman) यांचा हात असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने (US Intelligence) केला आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
बायडेन प्रशासन पुढच्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणेने दिलेला अहवाल जाहीर करणार आहे. ज्यामुळे सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधांत आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकन मीडियाच्या वृत्तानुसार, या गुप्त अहवालात असं आढळलं आहे की, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी वर्ष 2018 मध्ये पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येचे आदेश दिले होते.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजेंसने एक अहवाल तयार केला आहे. जो पुढील आठवड्यात सार्वजनिक केला जाणार आहे. जमाल खशोगीने वॉशिंग्टन पोस्टमध्ये सौदी अरेबिया सरकारवर टीका करणारे अनेक स्तंभ लिहिले होते. यामुळेच त्यांचा काटा काढण्यात आला आहे. खशोगी जेव्हा तुर्कीश नागरिकाकडून विवाहासंबंधित काही आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात गेले होते. तेव्हा त्यांना अंमली पदार्थ देवून जीवे मारण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह गायब करण्यात आला होता.
याप्रकरणी बायडेन प्रशासन, सौदी अरेबियाचे प्रशासक मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा करणार नसून त्यांचे वडील सलमान बिन अब्दुलजीज यांच्याशी चर्चा करणार असल्याचे संकेत दिले आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे, क्राउन प्रिन्स हाच देशाचा खरा शासक मानला जातो.