स्पेन, 2 मार्च: विजेची वाढती गरज आणि पारंपारिक ऊर्जा निर्मितीवर असलेल्या मर्यादा लक्षात घेता स्पेनमध्ये (Spain) आता जैविक ऊर्जा निर्मितीचे (Bio Electricity Production) प्रयोग सुरू आहेत. सिविले शहरात सध्या या अनुषंगाने एका अनोख्या प्रकल्पावर काम सुरु आहे. या प्रकल्पात शहरातील प्रसिध्द संत्र्यांच्या (Orange) सालीपासून तसेच खराब संत्र्यांपासून वीज निर्मिती केली जात आहे. हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पात खराब संत्र्यातून निघणाऱ्या मिथेन गॅसपासून (Methane Gas) वीजनिर्मिती होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे.
सातत्याने सुरु आहे चर्चा
स्पेनची राजधानी माद्रिदपासून (Madrid) सुमारे 500 किलोमीटर अंतरावर सिविले शहर वसले आहे. हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असल्याने कायमच चर्चेत राहिलं आहे. परंतु, यावेळी मात्र एका वेगळ्याच विषयामुळे हे शहर चर्चेत आहे. या शहरात पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने नवे प्रयोग होत आहेत. नुकताच येथील नगरपालिकेने खराब संत्र्यांपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोग केला आहे.
जैविक स्त्रोतांच्या वापरावर दिला जातोय भर
या प्रकल्पात नगरपालिकेसह युरोपियन असोसिएशन ऑफ पब्लिक वॉटर ऑपरेटर्सने योगदान दिलं आहे. शहरासाठी जैविक घटकांपासून वीजनिर्मिती करणं हे यांचे ध्येय आहे. यापुढे जात त्यांनी मोठी योजना आखली आहे. त्यानुसार 2023 पर्यंत पारंपरिक स्त्रोतांचा वीजनिर्मितीसाठी होणारा वापर कमी करुन अतिरिक्त वीजनिर्मिती करण्याचं प्रयोजन आहे.
खराब संत्री जमा करण्याचं काम 200 लोकांकडे
सांडपाणी प्रक्रियेदरम्यान जैविक पदार्थांपासून वीजनिर्मिती करण्याची कल्पना विशेषज्ज्ञांना सुचली. डीडब्ल्यूच्या अहवालात याबाबत सविस्तर संकल्पना मांडण्यात आली आहे. या प्रयोगासाठी शहरातून खराब संत्री जमा करण्याचं काम सुरु करण्यात आलं. हिवाळ्यात एकूण 48000 झाडांवरील सुमारे 5.7 दशलक्ष किलो संत्रीगळ होऊन नुकसान झालं होतं. ही नुकसानग्रस्त फळं जमा करण्यात आली. ही संत्री जमा करण्यासाठी 200 लोकांची नियुक्ती करण्यात आली. शहरात फिरुन झाडाखाली पडलेली संत्री जमा करण्याचं काम या लोकांना देण्यात आलं.
मिथेनपासून झाली वीजनिर्मिती
इलेक्ट्रीक ऊर्जा (Electric Power) आणि बायोगॅस (Biogas) निर्मितीसाठी जमा झालेल्या सुमारे 35 टन संत्र्यांचा रस काढण्यात आला. यावेळी उरलेली साले टाकून न देता त्याचा उपयोग खतनिर्मितीसाठी केला गेला. रस एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमुळे बायोगॅस निर्मिती झाली. या बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण 65 टक्के होते. याच मिथेनच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्यात आली.
किती बचत होणार?
या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पातून जवळपास 1500 किलोवॅट वीजनिर्मितीचा अंदाज आहे. या विजेचा सुमारे 150 घरांना फायदा होऊ शकतो. एवढ्या वीज निर्मितीसाठी ऊर्जाविभागाला जवळपास 3,10, 000 डॉलर्स खर्च येतो. खराब संत्र्यांमुळे किमान एवढी बचत होऊ शकते.
या प्रयोगादरम्यान 1000 किलोग्रॅम संत्र्यांपासून 50 किलोवॅट वीजनिर्मिती होऊ शकते. या विजेतून 5 घरांची एका दिवसाची गरज भागू शकते, असे स्पष्ट झाले आहे. जर संपूर्ण शहरातून खराब संत्री जमा करुन वीज निर्मिती केली तर सुमारे 73,000 घरांना वीजपुरवठा (Electricity Supply) होऊ शकतो. स्पेनमधील या शहरात 15000 टन संत्र उत्पादन होतं. ही सर्वच संत्री शहरातील नागरिक वापरत नाहीत. यातील मोठा वाट ब्रिटनला निर्यात होतो.
2050मधील उद्दिष्ट
सध्या हा प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाल्याने स्पेनचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे 2050 पर्यंत पारंपारिक स्त्रोतांचा वापर संपुष्टात आणून जैविक घटकांपासून ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी संत्र्यांसोबतच अन्य फळे, भाज्यांचा देखील वापर करण्याचे नियोजन आहे.
(हे पाहा: भयंकर! गर्भाशयातच झाला बाळाचा कोरोना मृत्यू, आईमुळे बाळालाही झाला होता Covid )
हैदराबादमध्ये भाज्यांपासून होतेय वीजनिर्मिती
असा प्रयोग करणारा स्पेन हा पहिला देश नाही. भारतातील हैदराबाद (Hyderabad) शहरात जैविक उर्जा निर्मितीचे विविध प्रयोग सुरु आहेत. येथील बोवनपल्ली बाजारसमितीत प्रतिदिन सुमारे 10 टन कचरा जमा होतो. त्यातून सुमारे 500 युनिट वीजनिर्मिती होते. तसेच जैविक खतांची निर्मिती देखील केली जाते. ही 500 युनिट वीज 100 स्ट्रिट लाईट, बाजारातील 170 स्टॉल्स, पाणीपुरवठा आणि प्रशासकीय इमारतीची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. या व्यतिरिक्त 300 किलोग्रॅम बायोगॅस निर्मिती होते. याचा उपयोग बाजारातील कॅंटीनमध्ये अन्न शिजवण्याकरिता इंधन म्हणून केला जातो.
विज्ञान प्रसार पत्रिकेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रयोगात प्रमुख भूमिका बजावणारे डॉ.ए.जी.राव यांच्या माहितीनुसार सुमारे 1400 टन भाज्यांपासून ही वीजनिर्मिती केली जातेय. यापासून सुमारे 32000 युनिट वीजनिर्मिती तर 700 किलोग्रॅम खतनिर्मिती (Fertilizers) झालीय. हे खत आता शेतीकामांसाठी वापरलं जातंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.