
तालिबानने अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात चोरीच्या आरोपाखाली तीन लोकांना गोळ्या घातल्या त्यानंतर लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी मृतदेह रस्त्यातच क्रेनवर लटकवून ठेवले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबान्यांनी सरकार स्थापन केल्यावर सुरक्षेची अनेक आश्वासनं दिली होती. परंतु आता ही घटना पाहता तालिबान अजिबात बदललेला नाही, उलट पूर्वीपेक्षाही अधिक क्रूर झाला आहे, हेच सिद्ध होतं.

डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार तालिबानने तीन अफगाणी नागरिकांना चोरीच्या आरोपावरून थेट देहांताची शिक्षा दिली. या लोकांचे हेरात प्रांतातून अपहरण करण्यात आलं आणि नंतर गोळ्या घालण्यात आल्या.

तालिबान आता अल्पसंख्य असलेल्या हाजारा समुदायाला लक्ष्य करत आहे. तालिबान्यांनी हजारा मुस्लिम समुदायाच्या 13 लोकांची निर्घृण हत्या केली आहे. त्यापैकी एक 17 वर्षीय मुलगी आहे.

300 तालिबानी आतंकवाद्यांनी 30 ऑगस्ट रोजी खिद्र जिल्ह्यात अफगाणिस्तान राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (ANSF) 11 माजी सदस्यांची हत्या केली होती.

तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळात 1996 आणि 2001 या वर्षांमध्ये हजारा या समाजावर खूप अत्याचार झाले होते. पंरतु आता तालिबाननं पुन्हा सत्ता हस्तगत केल्यानंतर आता त्यांनी पुन्हा त्यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे.




