नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: सध्या जाहिरात म्हटलं की त्यामध्ये सुंदर, आकर्षक स्त्री मॉडेल असतेच असते. फार कमी जाहिरातींमध्ये स्त्री मॉडेल नसते. स्त्रीच्या अशा वापराबाबत काहीवेळा आक्षेपही घेतला जातो, पण जाहिरातींमध्ये फार फरक पडलेला दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर सध्या अॅडिडास (Adidas Advertisement) या प्रसिद्ध स्पोर्ट्स वेअर ब्रँडची (Sports Wear Brand) जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. ट्विटरवर प्रसारित केलेल्या या जाहिरातीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून, त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Adidas कंपनीनं बुधवारी (09 फेब्रुवारी) आपल्या ट्विटरपेजवर एक जाहिरात प्रसारित केली. कंपनी लवकरच नवीन स्पोर्ट्स ब्रा उत्पादनांची श्रेणी (Sports Bra Line) बाजारात दाखल करणार आहे. त्या संदर्भातील ही जाहिरात असून, या जाहिरातीत कंपनीनं एक वेगळीच भूमिका मांडली आहे. कंपनीनं 25 महिलांच्या ब्रा न परिधान केलेल्या ब्रेस्टच्या फोटोंचं एक ग्रिड ट्वीट केलं असून, त्यात कंपनीच्या नवीन उत्पादनाची काहीही झलक दिसत नाही. या जाहिरातीची टॅगलाइन आहे सपोर्ट एव्हरीथिंग #SupportisEverything.
'महिलांच्या सर्व प्रकारच्या आकारातील आणि साइझमधील ब्रेस्ट्सना आधार आणि कंफर्टची गरज आहे, यावर आम्ही विश्वास ठेवतो. म्हणूनच आमच्या नवीन स्पोर्ट्स ब्रा श्रेणीमध्ये 43 स्टाईल्सच्या ब्रा उपलब्ध आहेत. यामुळे प्रत्येकीला आपल्यासाठी योग्य उत्पादन शोधता येईल.' असं कंपनीनं या जाहिरातीत म्हटलं आहे.
हे वाचा-एका आईची व्यथा! बाळाला कुशीत घेताच येतात वेदनादायी फोड; आपलं दूधही पाजू शकत नाही
या जाहिरातीने तत्काळ सगळयांचं लक्ष वेधून घेतलं आणि अगदी अल्प काळात ती जोरदार व्हायरल झाली. या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. त्यावर चर्चाही सुरू झाली मात्र कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे उत्पादनाबाबत नाही तर ब्रा घालण्याबाबत आणि कंपनीच्या या मार्केटिंग धोरणाबद्दल चर्चा होऊ लागली आहे.
स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या असून, बहुतेक महिला ग्राहकांनी त्यांना कंपनीच्या नवीन उत्पादन श्रेणीतील ब्रा पाहण्यास अधिक आवडले असते, असं म्हटलं आहे. काहींनी ही जाहिरात अयोग्य असल्याची टीका केली आहे. तर काहींनी ही जाहिरात त्यांना गोंधळात टाकत असल्याचं म्हटलं आहे. काहीनी जी जाहिरात धाडसी असल्याचं सांगत कंपनीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, ' महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा हा वर्कआउट पोशाखातील एकमेव सर्वात महत्वाचा भाग आहे' असं कंपनीनं याबाबतीत सीएनएन बिझनेसला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 'ब्रा मुळे महिलेच्या ब्रेस्टला मिळालेला आधार आणि आत्मविश्वास एखाद्याच्या कामगिरीवर आणि खेळात टिकून राहण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम करू शकतो,' असं कंपनीनं नमूद केलं आहे. कोणत्याही आकारातील ब्रेस्ट्सना आधाराची गरज असते हे दाखवण्यासाठी आम्ही ही जाहिरात केल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
हे वाचा-तुमच्या वयानुसार घ्या आहार, या पदार्थांच्या अतिरेकामुळे कमी होतंय आयुष्य
या जाहिरातीबाबत अॅपल, कोका-कोला आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल आदी कंपन्यांना सेवा देणारे मार्केटिंग आणि ब्रँडिंग तज्ज्ञ डेव्हिड प्लेसेक यांनी आपलं मत व्यक्त केलं. अॅडिडासची ही जाहिरात सनसनाटी जाहिरातीचं एक उदाहरण आहे,असं त्यांनी सांगितलं. 'ही जाहिरात बघून मला जाहिरातीवरील एका व्याख्यानाची आठवण होते. यात मला एक प्रश्न विचारण्यात आला होता, 'तुम्ही एखाद्याचं लक्ष कसं वेधून घ्याल?' तेव्हा एक नग्न स्त्री दाखवा, असं उत्तर मी दिलं होतं, असं प्लेसेक म्हणाले होते असं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारची जाहिरात ही एखाद्या लिफाफ्याप्रमाणे असते. ती वास्तविक उत्पादनापासून दूर असते. जाहिरातीत 43 महिलांनी नवीन स्पोर्ट्स ब्रा घातलेल्या दाखवल्या असत्या तर कदाचित कमी धक्कादायक वाटले असते. त्यानं कंपनीच्या उत्पादनाबद्दल उत्सुकता निर्माण केली असती,' असं प्लेसेक यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Advertisement