मुंबई, 11 फेब्रुवारी: आजकालच्या धावपळीच्या जगात कमी वयात डायबेटिस, रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार वाढत आहेतच; पण सर्वांत मोठी समस्या आहे ती लठ्ठपणाची (Obesity). यामुळेही अनेक आजारांना आमंत्रण मिळत असल्यानं बहुसंख्य लोक आता आरोग्याबाबत, वजनाबाबत जागरूक झाले आहेत. वजन कमी करण्यासह शरीर तंदुरुस्त रहावं यासाठी व्यायाम करण्यावर तसंच सकस, पौष्टिक आहार (Diet) घेण्यावर लक्ष दिलं जात आहे. मोठ्या संख्येनं लोक आपली जीवनशैली (Lifestyle) बदलण्यावरही भर देत आहेत. आरोग्य चांगलं राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका असते ती संतुलित आहार अर्थात डाएटची. तज्ज्ञांनीही उत्तम आरोग्यासाठी व्यायामाबरोबर आहारही महत्त्वाचा असल्याचं सांगितलं आहे. आरोग्यासाठी घातक आहार घेतल्यानं गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते आणि आपलं आयुष्य कमी होतं. त्यामुळे आपल्या आहारात पोषणमूल्ये योग्य प्रमाणात देणाऱ्या पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. हे वाचा- वाढत्या वजनाचं टेन्शन सोडा; आता इंजेक्शनने कमी होणार लठ्ठपणा नुकत्याच नॉर्वेमधील (Norway) बर्गन युनिव्हर्सिटीत (University of Bergen) झालेल्या एका अभ्यासात, मांसाहारी लोकांनी आपल्या आहारात धान्ये, शेंग भाज्या, पालेभाज्या, फळं, सुकामेवा यांचा समावेश करावा असा सल्ला देण्यात आला आहे. मांसाहारी लोकांच्या आहारात मटण, चिकन म्हणजे रेड मीट (Red Meat)आणि प्रोसेस्ड मीट (Processed Meat) म्हणजे प्रक्रिया केलेल्या मांसाहारी पदार्थांचे प्रमाण अधिक असते, आणि ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असतं. विशेषतः पाश्चात्य पद्धतीच्या आहारात रेड मीट, डेअरी प्रॉडक्टस, प्रोसेस्ड फूड यांचा अधिक समावेश असतो. रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटमध्ये फॅटस (fats) आणि मिठाचे (salt) प्रमाण खूप जास्त असते. यामुळे लठ्ठपणा, डायबेटिस , कर्करोग अशा अनेक आजारांचा धोका वाढतो, परिणामी आयुष्य कमी होतं. अनेकांना अकाली मृत्यूचा धोका वाढतो, असं या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. तसंच या संशोधनाचे मुख्य लेखक आणि आहार तज्ज्ञ प्रोफेसर लार्स फडनेस, यांनी आहार मोजमाप करून घेतल्यानं अधिक फायदा होईल. यामुळे योग्य पदार्थांची निवड करणं सोपं जातं,असा सल्ला दिला आहे. युरोपियन देशातील आहार आणि अमेरिकेतील आहार (US Diet) यांची कॉम्प्युटरच्या सहाय्याने तुलना करण्यात आली. वय आणि आहार आणि त्यानुसार आरोग्याची स्थिती, तक्रारी याचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. त्यावरून संशोधकांनी निष्कर्ष नोंदवले. त्यानुसार, पाश्चात्य देशांतील लोकांनी फळं, शेंग भाज्या, पालेभाज्या, कडधान्य आणि सुकामेवा यांचा आहारात समावेश केला तर त्यांचे आयुर्मान वाढू शकेल. असा आहार घेणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य चुकीचा आहार घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा 13 वर्षांनी अधिक असेल, असं संशोधकांनी या अहवालात नमूद केलं आहे. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या आहारातून रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट पूर्णपणे बंद केलं तर त्याचं आयुष्य 4 वर्षांनी वाढतं. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आहारातील या बदलाचा अधिक चांगला परिणाम दिसून आल्याचंही आढळलं असून, त्यामागचं कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. हे वाचा- ‘या’ समस्या आहेत तर खा पाणीपुरी! अगदी लठ्ठपणा आणि तोंड येण्यावरही आहे फायदेशीर 60 वर्षांच्या एखाद्या व्यक्तीनं फळं, भाज्या, धान्य, सुकामेवा यांचा आहारात जास्तीत जास्त वापर केला तर त्या व्यक्तीचं आयुष्य 8.5 वर्षांनी वाढू शकतं. 80 वर्षांच्या व्यक्तीनं आहारात असा बदल केल्यास त्याचं आयुष्य 3.5 वर्षांनी वाढू शकतं. 20 वर्षांची एखादी व्यक्ती जी आपल्या आहारात शेंगा, भाज्या, पालेभाज्या यांचा समावेश करत नसेल तिनं आपल्या आहारात दररोज 200 ग्रॅम भाज्या, एक वाटी डाळ यांचा समावेश केला तर तिचं आयुष्य 2.5 वर्षांनी वाढेल. भाज्यांमध्ये फॅटस अगदी कमी असतात मात्र त्यात प्रथिने, फायबर, व्हिटामिन, खनिजं यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे एखाद्याला आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर त्या व्यक्तीनं दररोज 225 ग्रॅम दलिया, ब्राऊन राईससह 25 ग्रॅम नट्स म्हणजे दाणे, सुकामेवा यांचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायामाइतकाच संतुलित आहारही (Diet)तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल, घातक आजारांपासून दूर रहायचं असेल तर आहारातून रेड मीट, प्रोसेस्ड मीट वगळून भाज्या, धान्यं यांचा योग्य प्रमाणात समावेश करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







