न्यूयॉर्क 11 मे : कोरोनानं (Coronavirus) संपूर्ण जगालाच आपल्या विळख्यात घेतलं आहे. या कठीण काळात अनेक रुग्णांचा (Covid-19 Patients) बळी जात आहे, परिणामी अंत्यसंस्कारासाठीही मृतांच्या कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती आहे. कुठे जागा मिळत नाहीये, कुठे रस्त्यावरच मृतदेह जाळावे लागत आहेत, तर कुठे आपलेच लोक मृतदेह (Dead body) ताब्यात घेण्यास नकार देत असल्याचं चित्र आहे. अशात आता अमेरिकेतूनही असंच मन हेलावणारं प्रकरण समोर आलं आहे. इथे अनेक रुग्णांचे मृतदेह मागील एका वर्षापासून दफन करण्यासाठी फ्रिजर ट्रकमध्ये ठेवलेले आहेत. मागील वर्षी जेव्हा अमेरिकेत कोरोना उच्चांकावर होता, तेव्हा अशी बातमी समोर येत होती, की कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं प्रशासनानं रुग्णांचे मृतदेह फ्रिजर ट्रकमध्ये ठेवले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे मृतदेह या फ्रिजर ट्रकमध्ये ठेवून आता जवळपास एक वर्ष झालं आहे. हे मृतदेह अजूनही दफन केले गेले नाहीत. द सिटीमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, स्थानिक प्रशासनानंही हे मान्य केलं आहे, की जवळपास 750 मृतदेह दफन करणं बाकी आहे. आता हे मृतदेह दफन करण्याचं काम सुरू केलं जात आहे. न्यूयॉर्क शहरात हार्ट आइसलॅन्ड नावाचं कब्रिस्तान आहे. हे इथलं सर्वात मोठं कब्रिस्तान आहे आणि इथे गरीबांचं आणि अज्ञात मृतदेह दफन केले जातात. ट्रकमध्ये ठेवण्यात आलेले हे मृतदेहही इथेच दफन केले जाणार आहेत. सध्या स्थानिक प्रशासन या मृतांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये कोरोनानं अक्षरशः हाहाकार घातला होता. यावेळी जे कुटुंबीय आपल्या माणसाला योग्य पद्धतीनं शेवटचा निरोप देण्यास इच्छुक होते, त्यांचे मृतदेह स्टोर करण्यात आले. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसला आहे. इथे 6 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 64 लाख अॅक्टिव्ह केस आहेत. मात्र, सध्या अमेरिका यातून बाहेर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.