• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • काबूल स्फोटात आईचा हात सुटून हरवला 3 वर्षांचा अली; 17 वर्षीय मुलानं कॅनडात आई-वडिलांजवळ पोहोचवलं

काबूल स्फोटात आईचा हात सुटून हरवला 3 वर्षांचा अली; 17 वर्षीय मुलानं कॅनडात आई-वडिलांजवळ पोहोचवलं

काबूल स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक मुलं आई-वडिलांपासून दुरावली. यातच अवघ्या तीन वर्षांचा अलीही (Ali) (नाव बदलले आहे) हरवला.

  • Share this:
काबूल 15 सप्टेंबर : अफगाणिस्तानात (Afghanistan) सुरू असलेल्या संकटामुळे हजारो नागरिक अफगाणिस्तान सोडून मिळेल त्या मार्गाने दुसऱ्या देशात आश्रय घेण्यासाठी धडपडत आहेत. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अमेरिकेसह, नाटो देशांनी इथं अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी विमानसेवा राबवली. त्यावेळी कसंही करून विमानात जागा मिळेल आणि आपण इथून बाहेर पडू या आशेनं हजारो अफगाणी नागरिक काबूल विमानतळावर (Kabul Airport) पोहोचले होते. याच दरम्यान 26 ऑगस्ट रोजी काबूलच्या विमानतळावर आत्मघातकी बॉम्बहल्ला करण्यात आला. अनेक महिला आणि मुलांचा यात बळी गेला. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक मुलं आई-वडिलांपासून दुरावली. यातच अवघ्या तीन वर्षांचा अलीही (Ali) (नाव बदलले आहे) हरवला. मात्र एका तरुणाच्या मदतीमुळे दोन आठवड्यांनंतर तो कॅनडामध्ये (Canada) त्याच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचला. अली आणि त्याच्या आई-वडिलांची झालेली ही भेट सर्वांनाच आशेचा किरण दाखवणारी ठरत आहे. अफगाणिस्तानात पुन्हा सुरु होतंय ‘ते’ बदनाम मंत्रालय, सामान्यांचं जगणं होणार कठीण दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबान्यांनी (Taliban) काबूल ताब्यात घेतल्यानंतर अलीची आई आपल्या मुलांसह कॅनडाला जाण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर आली. व्यवसायाच्या निमित्ताने अलीचे वडील दोन वर्षांपासून कॅनडात वास्तव्याला आहेत. काबूल विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटांनंतरच्या गोंधळादरम्यान अलीची आणि त्याच्या आईची ताटातूट झाली. एका 17 वर्षांच्या मुलानं तीन वर्षांचा चिमुकला अली घाबरून रडत असलेलं बघितलं आणि त्यानं अलीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला सुरक्षित ठिकाणी नेलं. त्यानंतर दोन दिवसांनी, 28 ऑगस्ट रोजी जेव्हा पुन्हा एअरलिफ्ट (Airlift) सुरू झालं, तेव्हा त्या मुलाने अलीला अमेरिकन सैनिकांच्या हवाली केलं. त्यांनी अलीला दोहाला (Doha) जाणाऱ्या विमानात बसवलं. दोहामध्ये आल्यावर अलीला एका अनाथाश्रमात ठेवण्यात आलं. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Qatar Foreign Ministry) अलीची काळजी घेतली. त्याच्या आई-वडिलांचा पत्ता मिळवला आणि दोन आठवड्यांनी, सोमवारी संध्याकाळी दोहा ते टोरांटो या विमानानं त्याला कॅनडाला रवाना करण्यात आलं. त्याच्यासोबत संयुक्त राष्ट्रसंघाची स्टेला ही अधिकारी महिला आली होती. 14 तासांच्या प्रदीर्घ प्रवासात अलीनं चित्रं काढत, चित्रपट बघत वेळ घालवला, असं तिनं सांगितलं. अलीला जवळ घेऊन तिनं त्याला निरोप दिला. अफगाणिस्तानमध्ये जीवघेणी गरिबी, वाट्टेल ते विकून नागरिक भरतायत पोट, पाहा PHOTOs विमानतळावर अलीला न्यायला आलेल्या त्याच्या वडिलांची, शरीफ (Ali’s Father) (नाव बदललं आहे) यांची अवस्था अगदी भावुक झाली होती. कारण त्यांनी दोन वर्षांनी आपल्या मुलाला पाहिलं होतं. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ते वारंवार त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होते, जणू खात्री करून घेत होते की अली सुखरूप त्यांच्यासमोर उभा आहे. अतिशय भावुक असा हा प्रसंग होता. दोन आठवडे आपण झोपलो नसल्याचं शरीफ यांनी सांगितलं. या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या शरीफ यांच्या मित्रानं आपण शरीफ यांचा आनंद समजू शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कारण दोन वर्षांपूर्वी त्यांनी शरणार्थी म्हणून कॅनडात आश्रय घेतला होता आणि दोन महिन्यांपूर्वीच ते आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानातून कॅनडाला आणण्यात यशस्वी झाले होते. अवघ्या तीन वर्षांचं मूल दोन आठवड्यांसाठी आई-वडिलांपासून, कुटुंबापासून दूर अनिश्चिततेच्या परीस्थितीत राहिल्यानंतर त्याची आणि कुटुंबीयांची काय मनःस्थिती असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अलीच्या आईची काय अवस्था झाली असेल याची तर कल्पनाही करवत नाही; पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी!' त्याचीच प्रचीती या घटनेतून आली आहे. अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वत्र निराशेचं वातावरण पसरलेले असताना ही घटना आशेचे किरण निर्माण करत आहे. माणुसकी अजून जिवंत असल्याचा पुरावा देत आहे.
First published: