देशातील या सुंदर ठिकाणी भारतीयांनाही प्रवेश नाही; फिरण्यासाठी लागते विशेष परवानगी

देशातील या सुंदर ठिकाणी भारतीयांनाही प्रवेश नाही; फिरण्यासाठी लागते विशेष परवानगी

भारतात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे भारतीयांनाही भेट देण्यासाठी परमिट आवश्यक आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : असे अनेक देश आहेत जिथे भारतीयांना भेट देण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असते. भारतीयांना या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळत नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे का की भारतातही अशी काही ठिकाणे आहेत जिथे जाण्यासाठी स्वत: भारतीयांनाही परवानगी घ्यावी लागते. याला इनर लाइन परमिट किंवा आयएलपी असेही म्हणतात. इनर लाइन परमिटचा नियम नवीन नाही.

स्वदेशात फिरण्यासाठी व्हिसा कशाला, असा प्रश्न कोणाच्याही मनात नक्कीच येऊ शकतो; मात्र देशांतर्गत ठिकाणं असूनही काही प्रदेशांची व्हिसाची गरज लागण्यामागे काही कारणं आहेत. त्याला इनर लाइन परमिट अर्थात आयएलपी असं म्हटलं जातं. हा परवाना लागणारी भारतातली ठिकाणं नेमकी कोणती आहेत, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथं जाण्यासाठी भारतीयांनादेखील विशेष परवाना घ्यावा लागतो. ही ठिकाणं संवेदनशील असल्याने स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त इतर भागातल्या नागरिकांना तिथे विनापरवाना जाण्याची परवानगी दिली जात नाही. सीमेलगत आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या ठिकाणी जाण्याकरिता इनर लाइन परमिट गरजेचं असतं. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होणं टाळणं, तसंच स्थानिक आदिवासींच्या संस्कृतीचं रक्षण व्हावं, या उद्देशाने तिथे परमिटशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

लडाख हे ठिकाण चीन आणि पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. त्यामुळे तो अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. पॅन्गॉंग, खारदुंगला पास आणि नुब्रा व्हॅलीसारख्या ठिकाणी जाण्याकरिता भारतीय पर्यटकांनाही स्पेशल परमिट अर्थात विशेष परवाना घेणं गरजेचं आहे.

मणिपूरला जाण्यासाठीदेखील भारतीय नागरिकांना परवाना घेणं गरजेचं असतं. तिथे जाताना तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि वैध ओळखपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

सिक्कीममधल्या संरक्षित भागात जायचं असेल, तर त्यासाठी इनर लाइन परमिट घेणं गरजेचं असतं. प्रवाशांना नाथुला पास, त्सोमगो बाबा मंदिर ट्रिप, झोंगरी ट्रेक, सिंगलिला ट्रेक, युमेसामडोंग, गुरुडोंगमार लेक ट्रिप, युमथांग आणि झिरो पॉइंट ट्रिप, तसंच थंगु-चोपटा व्हॅली ट्रिपसाठी परमिट आवश्यक असतं. हे परमिट पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाकडून दिलं जातं. हे परमिट तुम्ही बागडोगरा एअरपोर्ट आणि रंगपोचेक पोस्टवरून मिळवू शकता. स्पेशल परमिटसाठी टूर ऑपरेटर किंवा ट्रॅव्हल एजन्सीचीही मदत घेता येते.

वाचा - छोट्या शहरांपर्यंतचा विमान प्रवास महागणार, या तारखेपासून सरकारचा शुल्कवाढीचा निर्णय

लक्षद्वीपला जाण्याकरिताही पर्यटकांना परमिट घेणं आवश्यक असतं. परमिटसाठी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनचं क्लियरन्स सर्टिफिकेट गरजेचं असतं. याशिवाय कागदपत्रांचीही तपासणी केली जाते. परमिट मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचं क्लियरन्स सर्टिफिकेट लक्ष्यद्वीपमधल्या स्टेशन हाउस ऑफिसरकडे जमा करावं लागतं. लक्षद्वीपला जाण्यासाठी तुम्ही ऑनलाइन परमिटदेखील मिळवू शकता.

अरुणाचल प्रदेश हे राज्य म्यानमार, भूतान आणि चीनच्या सीमेलगत आहे. त्यामुळे हा भाग खूप संवेदनशील मानला जातो. स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त इतरांना तिथे जाण्यासाठी इनर लाइन परमिट गरजेचं असतं. पर्यटनासाठी नियोजन करणाऱ्या व्यक्ती नवी दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी आणि शिलॉंग इथे असलेल्या अरुणाचल प्रदेश सरकारच्या निवासी आयुक्तांकडून संरक्षित क्षेत्रासाठी परमिट मिळवू शकतात. सिंगल परमिट किंवा ग्रुप परमिटसाठी प्रति व्यक्ती 100 रुपये शुल्क आकारलं जातं. हे परमिट 30 दिवसांसाठी वैध असतं. अरुणाचल प्रदेशात जाण्यासाठी तुम्ही परमिट ऑनलाइनही मिळवू शकता.

मिझोराम हे राज्य म्यानमार आणि बांगलादेश या देशांच्या सीमेलगत आहे. या भागात अनेक आदिवासी समुदाय वास्तव्य करतात. या सुंदर ठिकाणी पर्यटनाकरिता जाण्यासाठी इनर लाइन परमिट गरजेचं आहे. हे परमिट तुम्ही सिल्चर, कोलकता, गुवाहाटी, शिलॉंग आणि नवी दिल्लीतल्या मिझोराम सरकारच्या संपर्क अधिकाऱ्यांकडून मिळवू शकता. तथापि जे या राज्यात विमानाने जातील, ते ऐझॉलच्या लेंगपुई विमानतळावरच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून विशेष पासदेखील घेऊ शकतात. मिझोरामला जाण्यासाठी दोन प्रकारची परमिट लागतात. त्यापैकी एक परमिट केवळ 15 दिवसांसाठी वैध असतं, तर दुसरं परमिट सहा महिन्यांसाठी वैध असतं.

नागालँड हे राज्य म्यानमारच्या सीमेलगत आहे. या भागात 16 प्रकारचे आदिवासी समुदाय वास्तव्य करतात. या भागातल्या आदिवासी नागरिकांची स्वतःची वेगळी भाषा, चालीरीती आणि खाद्यसंस्कृती आहे. ज्यांना या भागात पर्यटनासाठी जायचं आहे, त्यांना इनर लाइन परमिट घेणं गरजेचं असतं. कोहिमा, दिमापूर, नवी दिल्ली, मोकोकचुंग, शिलॉंग आणि कोलकात्यातल्या उपायुक्त कार्यालयातून हे परमिट मिळवता येतं. याशिवाय ऑनलाइनदेखील हे परमिट मिळवू शकता.

First published: November 21, 2022, 10:19 PM IST

ताज्या बातम्या