मुंबई, 28 सप्टेंबर : रिलायन्स फाउंडेशन (Reliance Foundation) आणि यूएस-एड (US-AID) या संस्थांनी सुरू केलेल्या वुमनकनेक्ट चॅलेंज इंडिया (WomanConnect Challenge India) या उपक्रमांतर्गत अर्थसाह्य देण्यासाठी भारतातल्या 10 संस्था-संघटनांची निवड करण्यात आली आहे. भारतात डिजिटल विश्वात तंत्रज्ञान वापरात स्त्रियांचं प्रमाण कमी असून, ते वाढवण्यासाठी म्हणजेच जेंडर डिजिटल डिव्हाइड (Gender Digital Divide) भरून काढण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिला सबलीकरण (Women Empowerment) करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 11 कोटी रुपयांहून अधिक (15 लाख अमेरिकी डॉलर्सहून अधिक) निधीची गुंतवणूक करण्यात आली असून, त्यात रिलायन्स फाउंडेशनने 8.5 कोटी रुपये म्हणजेच 11 लाख अमेरिकी डॉलर्सहून अधिक निधीचं साह्य केलं आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
या मुद्द्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधून काढणाऱ्या प्रकल्पांना हे अर्थसाह्य केलं जाणार आहे. यासाठी अनुदीप फाउंडेशन, बेअरफूट कॉलेज इंटरनॅशनल, सेंटर फॉर यूथ अँड सोशल डेव्हलपमेंट, फ्रेंड्स ऑफ वूमन्स वर्ल्ड बँकिंग, नांदी फाउंडेशन, प्रोफेशन असिस्टंस फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन, सोसायटी फॉर डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्हज, सॉलिडारिडाड रीजनल एक्स्पर्टाइज सेंटर, टीएनएस इंडिया फाउंडेशन आणि झेडएमक्यू डेव्हलपमेंट या 10 संस्थांची या उपक्रमांतर्गत निधी देण्यासाठी निवड झाली आहे. महिला शेतकरी, महिला उद्योजक, बचत गटांतल्या महिला आदींना डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे दूर करून तंत्रज्ञान वापरात मागे असलेल्या महिलांना पुढे आणण्यासाठी या संस्थांच्या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
या उपक्रमांतून 17 राज्यांतल्या जवळपास तीन लाखांहून अधिक महिला आणि मुलींना लाभ होणार आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांचं आर्थिक सबलीकरण (Economic Empowerment) वाढण्यास मदत होणार आहे.
या घोषणेच्या वेळी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, 'जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचं सबलीकरण करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही जिओ लाँच केलं, तेव्हा आम्ही डिजिटल क्रांती पाहिली होती, ज्यातून सर्वांना समान संधी उपलब्ध होतील. जिओच्या माध्यमातून देशभरात सर्वत्र कनेक्टिव्हिटी पुरवली जात आहे. भारतात असलेलं जेंडर डिजिटल डिव्हाइड भरून काढण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन यूएस-एडसोबत काम करत आहे. असमानता दूर करण्यासाठी तंत्रज्ञान हे उत्तम माध्यम आहे. वूमनकनेक्ट चॅलेंज इंडिया उपक्रमांतर्गत निधी मिळण्यासाठी ज्यांची निवड झाली आहे, त्यांचं अभिनंदन आणि परिवर्तनाच्या प्रवासाच्या वाटेवर स्वागत.'
दी वूमनकनेक्ट चॅलेंज इंडिया हा उपक्रम ऑगस्ट 2020मध्ये सुरू झाला. 180हून अधिक अर्जांतून 10 संस्थांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली. प्रत्येक संस्थेला 75 लाख रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी 12 ते 15 महिन्यांच्या कालावधीसाठी दिला जाणार आहे. जानेवारी 2021मध्ये यूएस-एड आणि रिलायन्स फाउंडेशनने सॉल्व्हर्स सिम्पोझियमचं आयोजन केलं होतं. त्यात यातल्या सेमी-फायनलिस्ट संस्था आणि तज्ज्ञ एकत्र आले होते. तेव्हा जेंडर डिजिटल डिव्हाइडबद्दल साधक-बाधक चर्चा झाली होती.
PM किसान योजना : शेतकऱ्यांना आता 2 हजारऐवजी मिळतील 4 हजार; वाचा सर्व प्रोसेस
मोबाइल इंटरनेटबद्दलची जागरूकता महिलांमध्ये वाढत आहे. 2017मध्ये भारतातल्या केवळ 19 टक्के महिला मोबाइल इंटरनेटबद्दल जागरूक होत्या. 2020मध्ये ते प्रमाण 53 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 79 टक्के पुरुषांकडे स्वतःच्या मालकीचा मोबाइल फोन आहे, तर 67 टक्के महिलांकडे स्वतःचा मोबाइल फोन आहे.
रिलायन्सच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये डिजिटल विश्वातली दरी भरून काढण्यास मदत झाली आहे. रिलायन्स जिओच्या माध्यमातून 1.3 अब्ज भारतीय या डिजिटल क्रांतीचे साक्षीदार आहेत. जिओ ही आज देशातली सर्वांत मोठी डिजिटल सर्व्हिसेस कंपनी असून, जगातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 120 दशलक्ष महिला जिओच्या युझर्स आहेत. या संख्येतही वेगाने वाढ होत आहे.
Jio युजर्ससाठी जबरदस्त ऑफर, या Recharge Plans वर मिळेल 20 टक्के Cashback
महिला दैनंदिन जीवनात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करतात किंवा त्यांना ज्या प्रकारे तंत्रज्ञानाची उपलब्धता होते, त्यात अर्थपूर्ण बदल करण्यासाठी जागतिक पातळीवरून उपाय काढण्याकरिता दी वूमनकनेक्ट चॅलेंज हा उपक्रम सुरू करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance, Woman, Women empowerment