मुंबई, 29 ऑक्टोबर: टेस्ला कंपनीचे मालक व अमेरिकी उद्योगपती एलन मस्क अखेर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक झाले आहेत. गेले सात महिने ते ट्विटर खरेदी करणार असल्याची चर्चा होती, एकदा तर डील फिस्कटलीदेखील, पण अखेर त्यांनी ट्विटर कंपनी खरेदी केली आहे. ट्विटर खरेदी केल्यावर ते या प्लॅटफॉर्मच्या क्षमता वाढवणार असल्याचं म्हणाले आहेत. त्यामुळे ट्विटरमध्ये येत्या काळात कोणते नवीन बदल पाहायला मिळतील, याबाबत जगभरातील युजर्समध्ये उत्सुकता आहे. या संदर्भात ‘एनडीटीव्ही हिंदी’ने वृत्त दिलंय. यूएस मीडियांतील वृत्तांनुसार, मस्क यांच्या पहिल्या निर्णयांपैकी एक म्हणजे ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेट सेगल आणि लीगल हेड विजया गड्डे यांना कामावरून काढून टाकणं हा निर्णय होता. महत्त्वाचं म्हणजे हे काम झालंय. आता इनसाइडर इंटिलिजन्सच्या विश्लेषक जॅस्मिन अॅनबर्ग यांच्या मते, ट्विटरच्या टॉप अधिकाऱ्यांना त्या पदावरून हटवण्याशिवाय मस्क यांच्याकडे पर्याय नव्हता. दोन्ही पक्षांना एकत्र काम करणं फार कठीण झालं असतं. आता सर्वांत आधी मस्क यांना या प्रमुख अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्या लागणार आहेत. ब्लूमबर्गच्या मते, सुरुवातीला मस्क स्वतः ट्विटरच्या सीईओची जागा स्वीकारतील. वॉशिंग्टन पोस्टच्या मते, मस्क यांना ट्विटरमधील 75 टक्के म्हणजे जवळपास सुमारे 5500 कर्मचारी कमी करायचे आहेत. अॅनबर्ग म्हणाल्या, ‘ट्विटरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची चिंता आहे. प्रॉडक्ट आणि इंजिनीअरिंग टीम्समधील कर्मचाऱ्यांची नोकरीही जाऊ शकते.’ हेही वाचा: एकच नंबर! Jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळते तब्बल 336 दिवसांची वॅलिडिटी एलन मस्क गुरुवारी म्हणाले की, त्यांना ट्विटर सर्वांसाठी ‘वार्म अँड वेलकमिंग’ बनवायचं आहे, सर्वांसाठी मुक्त नरक नाही. मस्क ट्विटरच्या उजव्या व अतिउजव्या विचारसरणीच्या लोकांवर लावण्यात येणाऱ्या सेन्सॉरशिपला विरोध करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ज्यांचं अकाउंट 2021 च्या सुरुवातीला कॅपिटल हिलवरील हल्ल्यानंतर ट्विटरकडून बंद करण्यात आलं होतं, त्यांना ट्विटरवर परत येण्याची परवानगी दिली जाईल, असे संकेत मस्क यांनी दिले आहेत. दरम्यान, ट्विटर आता चांगल्या व्यक्तीच्या हातात आहे, असं ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ सोशल नेटवर्कवर लिहिलं होतं. एलन मस्क यांच्यासाठी ट्विटरवरील एक मुख्य समस्या म्हणजे ट्विटरवरील फेक अकाउंट्स आहेत. फेक अकाउंट्सच्या मुद्द्यावरून त्यांनी ट्विटर डीलमधून माघार घेण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे आता ट्विटरचे मालक झाल्यानंतर ते या फेक अकाउंट्सचं प्रकरण कसं हाताळतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. अजून तरी त्यांनी याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही. या शिवाय ट्विटरची आर्थिक वाढ खूप कमी आहे, दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत ट्विटरला तोटा झालाय, त्यामुळे आर्थिक वाढीसाठी मस्क कोणते निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं असेल.
एप्रिलमध्ये मस्क यांनी ट्विटरचा महसूल वाढवण्यासाठी काही पर्यायांचा उल्लेख केला होता. यामध्ये सशुल्क सदस्यता वाढवणं, लोकप्रिय ट्विट्सच्या प्रसारातून कमाई करणं आणि जाहिरातदारांना प्लॅटफॉर्मवर विशेष कंटेंट तयार करण्यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन करणं, यांचा समावेश होता. नवीन युजर्सना आकर्षित करण्यासाठी आपल्याला ट्विटरवर किचन सिंक आणायचंय, असं मस्क यांनी ट्विटरवरील त्यांच्या नवीन प्रचार स्टंटमध्ये म्हटलं होतं. हरग्रीव्ह्ज लँड्सडाउनमधील वरिष्ठ गुंतवणूक आणि बाजार विश्लेषक सुसानाह स्ट्रीनर यांनी सांगितलं की, कट्टरपंथीय भाषणाला ट्विटरवरून रोखण्यासाठी दबाव आणावा, असा आग्रह अनेक सिव्हिक ग्रुप्स प्रमुख ब्रँड्सना करत आहेत.