नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि मजबूत बॉडीलाईनमुळे गेल्या काही वर्षांमध्ये कारचं आयुष्य खूप वाढलं आहे. आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या कार दीर्घकाळ चांगला परफॉर्मन्स देतात. यासोबतच कंपन्यांनी आता त्यांच्या गाड्यांच्या विक्रीनंतरच्या सर्व्हिसकडेही खूप लक्ष दिलं आहे. जवळपास प्रत्येक कंपनीच्या सर्व्हिस स्टेशनची संख्याही पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. कार खरेदी केल्यानंतर, अनेकजण दीर्घकाळ तिचा वापर करतात. जेव्हा यंत्रसामग्री दीर्घकाळ वापरली जाते तेव्हा तिचं सर्व्हिसिंग केलंच पाहिजे. कारच्या सर्व्हिसचा विचार केला जातो तेव्हा काही पार्ट आणि त्यांची किंमत वेळेनुसार बदलत जाते. जेव्हा एखादी कार एक लाख किलोमीटर चालल्यानंतर तिचं सर्व्हिसिंग केलं जातं तेव्हा येणारा खर्च बघून कुणालाही आश्चर्य वाटेल. याचं कारण म्हणजे हे बिल 30 हजार रुपयांवरून लाखांपर्यंत जाऊ शकते. एखादी कार एक लाख किलोमीटर धावल्यानंतर तिच्या सर्व्हिसिंगसाठी जास्त खर्च का येतो? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. कार एक लाख किलोमीटर धावल्यानंतर सर्व्हिसिंग करताना कंपनी त्यातील कोणते पार्ट बदलते? याबाबत जाणून घेऊया. कार एक लाख किलोमीटर धावल्यानंतरच्या सर्व्हिसिंगमध्ये बदलले जाणारे पार्ट्स - जेव्हा एखादी कार एक लाख किलोमीटर अंतर पूर्ण करते तेव्हा टायमिंग बेल्ट हा सर्वांत महत्त्वाचा भाग बदलला जातो. कारचे टायमिंग बेल्ट, बिअरिंग्ज आणि इतर फिटमेंट खूप महाग आहेत. टाइमिंग बेल्टचं किमान लाइफ 90 हजार किलोमीटरपासून ते एक लाख 20 हजार किलोमीटरपर्यंत असतं. जर टायमिंग बेल्ट तुटला तर तुमच्या कारचं इंजिन खराब होऊ शकतं. असं झाल्यास मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो किंवा कारचं आयुष्यही संपुष्टात येऊ शकतं. कारची क्लच प्लेटही बदलावी लागते. हादेखील जास्त महाग असलेला पार्ट आहे. तो बदलण्यासाठी कारचं इंजिन उघडावं लागतं. क्लच प्लेट बदलल्यानंतर तुमच्या कारचा पिकअप आणि मायलेज वाढतं. शिवाय, इंजिन दीर्घकाळ चांगलं राहतं. आजकाल मिळणाऱ्या वाहनांमध्ये इंजिन, फॅन आणि एसी मोटर एकाच पट्ट्यातून फिरत असले तरी काही वाहनांमध्ये हे पट्टे वेगवेगळे असतात. एक लाख किलोमीटर मर्यादेपर्यंत गाडी चालवल्यानंतर हे पट्टे खराब होऊ लागतात. त्यामुळे ते बदलण्याची गरज पडते. या पट्ट्यांचाही खर्च वाढतो. हेही वाचा - Car insurance रिन्यू करताय? मग लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर… कारचं इंजिनसुद्धा रेडिएटरसह फ्लश करून स्वच्छ केलं जाते. यानंतर इंजिन ऑइलचा ग्रेड हेवी केला जातो. त्यामुळे इंजिनचं आयुष्य वाढते. ही प्रक्रिया खर्चिक आहे. इंजिन आणि त्याच्या पार्ट्सव्यतिरिक्त, गाडीचं सस्पेन्शनचीदेखील दुरुस्ती केली जाते. फ्रंट शॉकअबसॉर्बर्स, आर्म्स, लिंकेज रॉड आणि एक्सलदेखील बदलले जातात. काही वेळा कारचे मागील शॉकअबसॉर्बर्सदेखील बदलले जातात. गाडीचे डिस्क आणि ब्रेक पॅडदेखील बदलले जातात. कारण, जास्त प्रमाणात वाहन चालवल्यानंतर कारच्या डिस्कला ओरखडे पडतात. ज्यामुळे ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि ब्रेक पॅड लवकर झिजतात. सर्व्हिसिंगनंतर नव्या गाडीप्रमाणे चालते कार - एक लाख किलोमीटर अंतर चालल्यानंतर कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस स्टेशनवर गाडी नेली पाहिजे. तिथे तिचं सर्व्हिसिंग केल्यानंतर तुमची कार शोरूममधून पहिल्यांदा बाहेर काढलेल्या कारप्रमाणे चालते. सर्व्हिसिंग केल्यानंतर कार व्यवस्थित चालत असली तरी कार बदलण्याची तयारी केली पाहिजे. एक लाख किलोमीटर अंतराचा प्रवास केल्यानंतर कारमधील बरेच पार्ट्स सतत खराब होऊ लागतात. ते पुन्हा-पुन्हा दुरुस्त करण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.