नवी दिल्ली, 8 जानेवारी : नवीन वर्षात व्हॉट्सअॅप सर्व्हिसचा वापर करणाऱ्या युजर्सला संपूर्ण अटींचा स्वीकार करावा लागेल. इन्स्टंट मेसेसिंग अॅप WhatsApp ने आपल्या टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केल्या आहेत. याबाबतचं नोटिफिकेशन भारतात मंगळवारपासून युजर्सला देण्यात येत आहे. जर युजर्सनी व्हॉट्सअॅपच्या सर्व अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांना व्हॉट्सअॅप अकाउंट डिलिट करावं लागेल. WhatsApp च्या नव्या अटी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार होत्या. परंतु त्या आतापासून हळू-हळू रोलआउट करण्यात येत आहेत. WABetaInfo ने ही माहिती एका स्क्रिनशॉटद्वारे शेअर केली आहे. युजर्सला आपलं अकाउंट सुरू ठेवण्यासाठी नव्या पॉलिसी अॅक्सेप्ट करणं आवश्यक आहे. सध्या ‘Not Now’चा ऑप्शनही देण्यात येत आहे, परंतु ही नवी पॉलिसी अॅक्सेप्ट करण्यासाठी 8 फेब्रुवारी 2021 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. नव्या पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यास, अकाउंट डिलिट होऊ शकतं.
WhatsApp ने अपडेट पॉलिसीमध्ये, कंपनीला देण्यात येणाऱ्या लायसन्समध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. यात लिहिलं आहे की, आमच्या सर्व्हिसेस ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपला, जो कंटेन्ट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसिव्ह केला जातो, त्याला यूज, रिप्रोड्यूस, डिस्ट्रिब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूसिव्ह, रॉयल्टी फ्री, ट्रान्सफरेबल लायसन्स देते. WhatsApp ने आपल्या टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केल्या आहेत, त्यामुळे युजर्सला WhatsApp चा वापर करण्यासाठी त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतील.