मुंबई, 25 ऑक्टोबर: सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. सर्वजण एकमेकांना प्रत्यक्ष भेटून तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान गेल्या तासाभरापासून व्हॉट्सअपचा सर्व्हर डाऊन झाल्याचं निदर्शनास आलं आहे. ऐन दिवाळीच्या काळात व्हॉट्सअप डाउन झाल्यामुळं देशभरातील नेटकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कोणताही मॅसेज व्हॉट्सवरून जात नाही, त्याचप्रमाणे ऑडिओ तसेच व्हिडीओ कॉलही होत नसल्याच्या तक्रारी देशातील विविध भागातील युजर्सनी केल्या आहेत. गेल्या तासाभरापासून राज्यातील सर्व युजर्सना व्हॉट्सअप सर्व्हर डाउनमुळं त्रासाला सामोरं जावं लागत आहे. ही समस्या नेमकी कशामुळं झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान अनेक युजर्सनी ट्विटरवर याबदद्ल माहिती देण्यास सुरुवात केली आहे. देशासह राज्यातील विविध ठिकाणी व्हॉट्सअप डाउन- देशातील विविध भागातील युजर्सना आज व्हॉट्सअप सर्व्हर डाउनचा फटका बसत आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे इत्यादी शहरांसह विविध भागांतील व्हॉट्सअप युजर्सनी व्हॉट्सअप सर्व्हर डाउनच्या तक्रारी केल्या आहेत. ऐन दिवाळीची धामधूम सुरु असताना व्हॉट्सअपमध्ये निर्माण झालेल्या या समस्येमुळं नेटकऱ्यांची मात्र अडचण झाली आहे. हेही वाचा: हे मेसेज पाठवाल तर थेट तुरुंगात जाल! WhatsAppचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? पाऊण तासापासून व्हॉट्सअप सर्व्हर डाउन, अनेक कामं ठप्प- अलीकडच्या काळात व्हॉट्सअप फक्त वैयक्तिक चॅट किंवा कॉलिंगपुरतं मर्यादित राहिलं नाही. अनेक कार्यालयीन कामांकरता देखील व्हॉट्सअपचा वापर केला जातो. दरम्यान व्हॉट्सअपमधील या तांत्रिक समस्येनुसार कार्यालयीन कामांचाही खोळंबा झाला आहे. जवळपास तासाभरापासून ही सेवा ठप्प असल्याची माहिती मिळाली आहे. व्हॉट्सअपकडून सेवा ठप्प का झाली याचं कारण अद्याप देण्यात आलं नाही. याआधी देखील Whatsapp ची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे युजर्सला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
WhatsApp services have been down for the last 30 minutes. pic.twitter.com/9WL4mMFTRO
— ANI (@ANI) October 25, 2022