नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : WhatsApp जगभरात सर्वातधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. करोडो लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या या अॅपला हॅकर्स (Hackers) आणि स्कॅमर्सद्वारा (Scammers) टार्गेट करणं सोपं आहे. सावधगिरीने याचा वापर न केल्यास अधिकतर युजर्समुळे, हॅकर्सला whatsapp account hack करण्याची संधी मिळते. अनेक हॅकर्स या अॅपला हॅक (Hack) करण्यासाठी ओटीपीचा (OTP) वापर करतात. त्यानंतर स्मार्टफोनमधील माहिती (Private Data) काढणं त्यांना सोपं जातं.
काय आहे व्हॉट्सअॅप ओटीपी स्कॅम (WhatsApp OTP scam) -
नवीन स्मार्टफोनमध्ये आपल्या रजिस्टर्ड नंबरने WhatsApp वर अकाउंट बनवण्यासाठी कंपनी एक ओटीपी पाठवते. ओटीपी एंटर करण्यावेळी दोन गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. ओटीपीसाठी आपला रजिस्टर्ड फोन नंबर द्यावा लागतो. आणि दुसरी बाब म्हणजे कंपनी न मागता कधीही कोणताही ओटीपी पाठवत नाही. आता हॅकर्स आणि स्कॅमर्स ओटीपीद्वारे लोकांचे फोन हॅक करत आहेत. तुमचा मित्र किंवा नातेवाईक बनून हॅकर्स संपर्क करतात, फोनवर त्यांचं अकाउंट बंद झालं असून त्यांना मदत हवी असल्याचं सांगतात, आणि तुमच्याकडून ओटीपी घेतात.
हॅकर्स नेमकं काय करतात -
हॅकर्स तुमच्या नातेवाईकाचं अकाउंट हॅक झाल्याचं सांगतात. त्यानंतर, त्यांच्या नंबरवर कोणताही ओटीपी मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला ओटीपी पाठवत आहोत, तो तुम्ही शेअर करा, असं सांगतात. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येतो. तो ओटीपी शेअर करायला सांगितला जातो. जसा ओटीपी शेअर कराल, तसं लगेच तुमचं व्हॉट्सअॅप लॉगआउट होईल. त्यानंतर तुमचं अकाउंट दुसऱ्याच व्यक्तीच्या डिव्हाईसवर वापरलं जात असेल.
असं झालं तर काय कराल -
जर तुम्ही अशा हॅकमध्ये फसलात, तर सर्वात आधी व्हॉट्सअॅप अकाउंट रिसेट करा. त्यानंतर पुन्हा लॉगइन करा. त्यासाठी तुमचा रजिस्टर्ड नंबर एंटर करावा लागेल. त्यानंतर पुन्हा ओटीपी येईल. त्या ओटीपीद्वारे तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट पुन्हा लॉगइन करू शकता. यामुळे हॅकर्स किंवा स्कॅमर्सच्या डिव्हाईसवर तुमच्या मोबाईल नंबरने वापरलं जाणारं व्हॉट्सअॅप अकाउंट बंद होईल.
ओटीपी स्कॅमपासून कसं वाचाल -
व्हॉट्सअॅप स्कॅमपासून वाचण्यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही व्हॉट्सअॅपकडे ओटीपी मागत नाही, तोपर्यंत कंपनी ओटीपी पाठवत नाही. त्यामुळे तुम्ही न मागताच ओटीपी नंबर पाठवला गेल्यास, तो फसवणूकीचा असू शकतो. असा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका. कोणत्याही मित्राने, नातेवाईकाने ओटीपी मागितल्यास शेअर करू नका. असा मेसेज आलाच, तर हॅकर्सनी नाव घेतलेल्या व्यक्तीला फोन करुन चौकशी करा. टू-फॅक्टर ऑथेंटिफिकेशनही अॅक्टिव्ह करू शकता.