तुम्ही कोणासोबत आणि किती वेळ बोलता? व्हॉटसअ‍ॅपमधील या त्रुटीमुळे हॅकर्स करताहेत हेरगिरी

तुम्ही कोणासोबत आणि किती वेळ बोलता? व्हॉटसअ‍ॅपमधील या त्रुटीमुळे हॅकर्स करताहेत हेरगिरी

काही महिन्यांपूर्वी व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन (Privacy Policy)वादंग निर्माण झालं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल: व्हॉटसअ‍ॅप (WhatsApp) हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचे अनेक फायदे आणि तोटेदेखील आता समोर आले आहेत. जगभरात व्हॉटसअ‍ॅपवर दैनंदिन अ‍ॅक्टिव्ह युझर्सची संख्या सुमारे 2 अब्जांहून अधिक आहे. अशी स्थिती असली तरी हे अ‍ॅप अनेकदा वादग्रस्तदेखील ठरलं आहे. काही महिन्यांपूर्वी व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन (Privacy Policy) वादंग निर्माण झालं होतं.

या पॉलिसीला अनेकांनी जोरदार विरोध देखील केला होता. तसेच अनेक युझर्सने व्हॉटसअ‍ॅपला पर्याय ठरु शकणाऱ्या अन्य अ‍ॅप्सचा वापर देखील सुरु केला होता. सर्व बाबी काटेकोर असूनही व्हॉटसअ‍ॅप युझर्सची गोपनीयता किंवा प्रायव्हसी धोक्यात आहे, असं मानलं जातं. आता व्हॉटसअ‍ॅपच्या ऑनलाईन स्टेटसमध्ये असलेल्या(Online Status)त्रुटींमुळे लोकांच्या गोपनीयतेस धोका निर्माण झाला आहे.

व्हॉटसअ‍ॅपवरील संभाषणाचा कालावधी आता शोधला जाऊ शकतो

व्हॉटसअॅपच्या ऑनलाईन स्टेटसच्या त्रुटींचा फायदा घेत लोकं आता आपले सहकारी,नातेवाईक आणि मुलांची हेरगिरी करत आहेत. ट्रेस्डच्या अहवालानुसार,हॅकर्स व्हॉटसअ‍ॅप ऑनलाईन स्टेटस ट्रॅकर वेबसाईट आणि अॅप्सच्या माध्यमातून युझर्स त्यातही खासकरुन आपले सहकारी,ओळखीतील मुलींची पर्सनल माहिती (Personal Information)अ‍ॅक्सेस करीत आहेत.

या अहवालानुसार,कोणती व्यक्ती कोणाबरोबर व्हॉटसअ‍ॅपवर संभाषण करीत आहे हे व्हॉटसअ‍ॅप ऑनलाईन स्टेटस ट्रॅकरचा वापर करुन आता जाणून घेता येणं शक्य आहे. तसेच कोणती व्यक्ती किती वेळ संभाषण करीत होती, दिवसातून किती वेळा संभाषण झाले हे देखील आता ट्रॅक करता येत आहे.

व्हॉटसअ‍ॅपवर जेव्हा कोणी ऑनलाईन येते,तेव्हा संबंधित व्यक्तीची प्रोफाइल आपोआप दर्शवते की ती व्यक्ती आता ऑनलाईन आहे. हे स्टेटस कोणीही पाहू शकते. अगदी युझरने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक सेव्ह केला नसेल तरी हे स्टेटस दिसू शकते. याचाच फायदा घेत व्हॉटसअ‍ॅप स्टेटस ट्रॅकर (WhatsApp Status Tracker) कोणत्याही युझरला सातत्याने मॉनिटर करु शकतो.

या वेबसाईटसवर कोणत्याही युझरचा व्हॉटसअॅप क्रमांक टाकून तो युझर कोणत्या वेळी आणि किती कालावधीसाठी ऑनलाईन होता हे जाणून घेता येणे शक्य आहे. याच पॅटर्नचा उपयोग करुन लोक आपले सहकारी आणि मुलांची हेरगिरी करत आहेत. त्यामुळेच तंत्रज्ञान जसं वरदान आहे तसंच ते सावधपणे वापरलं नाही तर शाप ठरू शकतं हे सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवं. आपल्या खासगी गोष्टींपैकी कोणती माहिती सर्वांसाठी खुली करायची आणि कोणती करायची नाही हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे.

First published: April 16, 2021, 4:14 PM IST

ताज्या बातम्या