मुंबई, 30 डिसेंबर : सध्याच्या काळात ई-मेल, बॅंकिंग विषयक कामं असोत अथवा दैनंदिन वापरातला स्मार्टफोन (Smartphone) असो, या प्रत्येक गोष्टीच्या सुरक्षेसाठी पासवर्ड (Password) महत्त्वाचा असतो. कोणत्याही गोष्टीकरिता पासवर्ड ठेवताना संबंधित व्यक्ती कसा विचार करते, पासवर्डची निवड कशी करते आणि पासवर्ड विसरू नये यासाठी काय करते याविषयी अनेक प्रकारचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. आता अशा एका पासवर्डविषयी माहिती देणार आहोत की जो खरोखरच अनोखा आहे. हा पासवर्ड वेळेनुसार बदलतो आणि विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती पासवर्ड बदलत असला तरी तो विसरत नाही. या पासवर्डला टाइम पासवर्ड (Time Password) असं संबोधलं जातं.
`नॉर्डपास`च्या (Nord pass) वृत्तानुसार, password हा शब्द भारतातला (India) सर्वांत लोकप्रिय पासवर्ड मानला जातो. याचाच अर्थ भारतातल्या बहुसंख्य व्यक्ती पासवर्ड म्हणून password या शब्दाचा वापर करतात. भारताप्रमाणेच जपानमध्येही (Japan) या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे जपान हा देश याबाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय भारतीय व्यक्ती पासवर्ड म्हणून व्यक्तीच्या नावांचाही वापर करतात. त्यात iloveyou, krishna, Sairam आणि omsairam आदींचा समावेश आहे.
टाइम पासवर्ड प्रामुख्याने फोनसाठी वापरला जातो. तो करंट टाइम (Current Time) म्हणजेच चालू वेळेनुसार सेट होतो आणि आपोआप बदलतो. ज्याप्रमाणे घड्याळातली वेळ बदलते, त्यानुसार पासवर्डदेखील बदलतो. विशेष म्हणजे हा पासवर्ड कोणी दुसऱ्या व्यक्तीनं पाहिला तरी ती त्याचा वापर करू शकत नाही. कारण फोन सुरू करतेवेळी घड्याळात जी वेळ दर्शवलेली असते, त्यानुसार पासवर्ड सेट होतो. उदाहरण द्यायचं झालं तर घड्याळात 12 वाजून 10 मिनिटं अशी वेळ दिसत असेल तर तुमचा पासवर्ड 1210 असेल. एका मिनिटानंतर तुम्ही हा पासवर्ड फोन सुरू करण्यासाठी वापरला तर तो निकामी झालेला असेल. कारण तुमच्या फोनचा पासवर्ड 1211 असा झालेला असेल. यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
अनेकांच्या मते, दुसऱ्या व्यक्तीला पासवर्ड सांगण्याची वेळ आली, तर तो एका मिनिटाने बदललेला असेल. त्यामुळे फारशी अडचण निर्माण होणार नाही. काही जणांच्या मते, या पासवर्डचा वापर करणं चुकीचं आहे. कारण तुम्ही टाइम पासवर्ड ठेवला आहे, हे दुसऱ्या व्यक्तीला सहज कळेल आणि अन्य कोणीही तुमचा फोन अॅक्सेस (Access) करू शकेल. याशिवाय फोन इन अॅप्लिकेशन्स आणि सुरक्षिततेविषयीदेखील अनेकांनी मतं व्यक्त केली आहेत.
टाइम पासवर्डचा विचार करता, हा पासवर्ड वापरणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य असेल. हा पासवर्ड वापरण्यासाठी तुम्हाला खास अॅप (App) डाउनलोड करावं लागेल. गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यापैकी एखादं अॅप डाउनलोड करून तुम्ही तुमच्या फोनला प्रत्येक मिनिटाला अपडेट होणारा टाइम पासवर्ड सेट करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Password, Smartphone