मुंबई : अनेकदा असं होतं की, तुम्हाला एखादा महत्त्वाचा मेल येतो पण तो इनबॉक्समध्ये दिसतच नाही. तुम्हाला उशिरा अशा मेलबद्दल समजतं. जर हा मेल नोकरीच्या संधीचा वगैरे असेल तर मग तुमच्याकडे हळहळ व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. तुमच्यासोबतही असं कधी झालंय का? जीमेल इनबॉक्स फुल झाल्यामुळे अनेकांना अशा समस्येचा सामना करावा लागतो. अनेक वेळा आपण आलेल्या मेल्सकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे इनबॉक्स अनावश्यक मेलनं भरत राहतो. प्रत्येकानं आपल्या जीमेलचा इनबॉक्स वेळोवेळी रिकामा केला पाहिजे, जेणेकरून एखादा महत्त्वाचा मेल आपल्याकडून दुर्लक्षित होणार नाही. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. स्टोरेजची अडचण सोडवण्यासाठी गुगल आता Gmail, Google Drive आणि Google Photos साठी विनामूल्य क्लाउड स्टोरेज प्रदान करते. पण, कधी-कधी हे स्टोरेज देखील फुल होतं. स्टोरेज फुल झाल्याचा मेसेज पुन्हा-पुन्हा पाहावा लागू नये म्हणून आजकाल लोक स्टोरेज विकत घेतात. पण, स्टोरेज खरेदी करण्यापूर्वी आपण अगोदर जीमेलमध्ये जागा तयार केली पाहिजे. कारण बर्याच वेळा अशा फाईल्स आपल्या मेलमध्ये पडून असतात ज्यांचा काहीही उपयोग नसतो आणि त्या फक्त स्टोरेज भरण्याचं काम करत असतात. यापैकी बहुतेक स्पॅम आणि नको असलेले मेल असतात. असे मेल्स कसे डिलीट करायचे याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. स्पॅम किंवा अनावश्यक ईमेल कसे डिलीट करावेत? - तुमच्या पीसी किंवा मोबाइल डिव्हाइसवरील कोणत्याही ब्राउझरवर Gmail उघडा. - त्यानंतर इनबॉक्स/सोशल/स्पॅम फोल्डर किंवा इतर फोल्डरमध्ये जा ज्यामधून तुम्हाला ईमेल हटवायचे आहेत. - टॉपला दाखवलेल्या तीन ओळींवर क्लिक करा. - त्यानंतर डिलीट करायचे असलेले मेसेज निवडा. - शेवटी डिलीट ऑप्शनवर क्लिक करा. डिलीट केल्यानंतर हे मेल ट्रॅशमध्ये जातात. तिथूनही हे मेल डिलीट करून टाका. हेवी फाईल्स असलेले ईमेल कसे डिलीट करावेत? - सर्च बॉक्समध्ये has:attachment larger:10M (तुम्ही तुमच्या गरजेनुसार फाईल साईट टाकू शकता) असं टाईप करा. - सर्च ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर डिलीट करायचे असलेले मेल सिलेक्ट करून डिलीट ऑप्शनवर टॅप करा. - पेजच्या डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूवर क्लिक करा किंवा Trash ऑप्शनवर क्लिक करा. - शेवटी Empty trash now ऑप्शनवर क्लिक करा. अनरीड मॅसेजेज कसे डिलीट करावेत? - ब्राउझरमध्ये Gmail ओपन करा. - कॅटेगरी टाइममध्ये label:unread किंवा label:read टाईप करून एंटर दाबा. - त्यानंतर, Gmail तुमच्या डिस्प्लेवर सर्व न वाचलेले किंवा वाचलेले मेल दाखवेल. - त्यानंतर सिलेक्ट ऑल बॉक्सवर क्लिक करा. यानंतर, Select all conversations that match this search वर टॅप करा. - शेवटी डिलीट आयकॉनवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.