वाराणसी 13 मार्च : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचा 'रा-वन' आणि सुपरस्टार रजनिकांत यांचा 'रोबो' चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटात रोबो माणसांशी बोलताना दाखवलं आहे. पण एखादा रोबो खऱ्या आयुष्यात तुमच्याशी मराठीत किंवा तुमच्या भाषेत बोलायला लागला तर आश्चर्य वाटेल ना? पण आता मूळचे उत्तर प्रदेशतल्या राजमलपूर गावचे रहिवासी असलेल्या दिनेश पटेल यांनी 'शालू' नावाचा रोबो (Shalu Robot) तयार केला असून हा रोबो एक-दोन नाही तर तब्बल 47 भाषांमध्ये बोलतो.
दिनेश पटेल हे आयआयटी मुंबईमध्ये (IIT Bombay) असणाऱ्या केंद्रीय विद्यालयामध्ये (Kendriya Vidyalaya) कम्प्युटर सायन्सचे शिक्षक (Computer Science teacher) आहेत. बॉलिवूडच्या 'रोबो' चित्रपटापासून प्रेरित होऊन दिनेश पटेल यांनी शालू नावाचा रोबो तयार केला. हा रोबो हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स (Hanson Robotics) कंपनीने तयार केलेल्या 'सोफिया' रोबोसारखाच आहे. पटेल यांनी तयार केलेला रोबो 9 स्थानिक भाषांसह 38 परदेशी भाषांमध्ये बोलतो.
दिनेश पटेल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, 'शालू रोबो प्लॅस्टिक, पुठ्ठा, लाकूड, अॅल्युमिनियम इत्यादी टाकाऊ साहित्यांपासून तयार करण्यात आला आहे. हा रोबो तयार करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला असून 50 हजार रुपयांचा खर्च आला आहे. 'हा रोबो उत्तम प्रकारे संवाद साधत असल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे तो फक्त एक-दोन नाही तर 47 भाषांत संवाद साधतो.
दिनेश पटेल यांनी पुढं सांगितलं की, 'शालू रोबो एक प्रोटोटाइप आहे. हा रोबो सामान्य माणसाप्रमाणं एखाद्याला ओळखू शकतो, गोष्टी लक्षात ठेवू शकतो, सामान्यज्ञान आणि गणिताशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. तसंच, शालू रोबो लोकांशी संवाद साधू शकतो, भावना व्यक्त करु शकतो, वृत्तपत्र वाचू शकतो, पाककृती सांगू शकतो आणि इतर बऱ्याच गोष्टी करुन दाखवू शकतो. हा रोबो शाळांमध्ये शिक्षक आणि ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून वापरला जाऊ शकतो.'
पटेल यांनी सांगितलं की, 'त्यांनी आतापर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला आहे. पण मास्कच्या सहाय्याने हा रोबो आणखी सुंदर तयार करता येईल.' दरम्यान, आयआयटी मुंबईमधील कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्राध्यापक सुप्रतीक चक्रवर्ती यांनी शालू रोबोचं कौतुक केलं आहे. दिनेश पटेल यांना लिहिलेल्या पत्रात चक्रवर्ती यांनी म्हटलंय की, 'हे खरोखरंच एक मोठं पाऊल आहे. असा रोबो शिक्षण, मनोरंजन आणि इतर क्षेत्रात वापरला जाऊ शकतो. शालू रोबो पुढील पिढीतील वैज्ञानिकांसाठी प्रेरणादायक ठरु शकतो.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IIT, Mumbai, Robot, Tech news, Technology