मुंबई 25 ऑक्टोबर : खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या वैशिष्ट्यपूर्ण घटना मानल्या जातात. अनेक वर्षांनंतर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने खगोलप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकदेखील यासाठी उत्सुक असतात. आज (25 ऑक्टोबर 22) सूर्यग्रहण आहे. हे या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं ग्रहण आहे. त्यामुळे ही अद्भुत घटना कॅमेरात टिपण्यासाठी अनेकांचा निश्चितच प्रयत्न असेल. पूर्वी फोटोग्राफीसाठी विविध प्रकारचे कॅमेरे वापरले जात. सध्याच्या काळात स्मार्टफोनमुळे मोठ्या कॅमेरांचा वापर काहीसा कमी झाला आहे. स्मार्टफोन कॅमेरात फोटोग्राफीचं प्रगत तंत्रज्ञान असल्याने असे खास क्षण टिपण्यासाठी त्याचाच प्राधान्याने वापर होतो. आज होणारं सूर्यग्रहण टिपण्यासाठी तुम्हीदेखील स्मार्टफोन कॅमेराचा वापर करणार असाल, तर काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरातून हे ग्रहण टिपताना काही तांत्रिक गोष्टींचा वापर केल्यास तुम्ही काढलेले फोटो निश्चितच चांगले येतील. आज सूर्यग्रहण आहे. ही अद्भुत खगोलीय घटना स्मार्टफोन कॅमेरात टिपण्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असाल. मात्र यासाठी स्मार्टफोनमधील काही विशिष्ट तांत्रिक गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील. आम्ही तुम्हाला या गोष्टींविषयी खास टिप्स देत आहोत. हे ही पाहा : कधी पाहिलीय सोन्याची काजू कतली? Video मुळे नेटकऱ्यांमध्ये रंगली जोरदार चर्चा सूर्यग्रहणावेळी थेट प्रकाश किरणांमुळे तुमच्या कॅमेराचे सेन्सर्स खराब होऊ शकतात. त्यामुळे कॅमेरा लेन्ससमोर एक्स -रे फिल्म किंवा यूव्ही फिल्टर लावावा. यामुळे तुमच्या स्मार्टफोन कॅमेराचा सेन्सर्स सुरक्षित राहील. सूर्यग्रहणाचे क्षण टिपण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम योग्य लोकेशन निवडा. यासाठी संपूर्ण आकाश दिसेल अशी मोकळी जागा शोधून ठेवा. आकाश आणि तुमच्यामध्ये कोणत्याही केबल्स, बिल्डिंग नसेल याची काळजी घ्या. सूर्यग्रहणाचे क्षण तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने फोटोंसह व्हिडिओंमध्येही टिपू शकता. यासाठी टाईम लॅप्स व्हिडिओ हा पर्याय उत्तम ठरेल. मात्र याकरिता तुमच्याकडे कॅमेरा सेटअप ट्रायपॉड हवा. तसंच व्हिडिओ काढताना शक्य असेल तर तुमच्या स्मार्टफोनला पॉवर बॅंक कनेक्ट करून ठेवावी. ग्रहणादरम्यान सूर्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढताना ट्रायपॉडचा वापर उत्तम ठरेल. यामुळे तुम्ही स्थिर आणि ‘ब्लर फ्री’ शॉट्स घेऊ शकाल. तसंच यामुळे तुम्ही घरात बसून रिमोटच्या सहाय्याने फोटो क्लिक करू शकता. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये 48MP, 64MP, 108 MP असे हाय सेन्सर्स असतील तर त्याचा वापर फोटो कॅप्चरिंगसाठी करा. कॅमेराच्या सेटिंग्जमधून तुम्ही सेन्सर्स अॅक्सेस करू शकता. झूमऐवजी हाय रेझोल्युशन फोटो क्रॉप करणं योग्य ठरेल. याशिवाय झूमऐवजी तुम्ही टेलिफोटो सेन्सरचा वापर करू शकता.
HDR मोडचा वापर करून तुम्ही ब्राइट फोटो क्लिक करू शकता. यामुळे फोटोचा दर्जा आणि स्पष्टता वाढेल. कॅमेरा हलू नये यासाठी तुम्ही बिल्ट -इन- टायमर किंवा रिमोट शटरचा वापर करू शकता. यामुळे तुम्ही शेक-फ्री शॉट्स घेऊ शकाल. ग्रहणादरम्यान फोटोग्राफी करण्यापूर्वी स्वतःची विशेष काळजी घेणंदेखील आवश्यक आहे. सूर्याची तीव्र किरणं तुमच्या त्वचा किंवा डोळ्यांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे फोटोग्राफी करण्यापूर्वी अंगभर कपडे परिधान करा तसंच सनग्लासेसचा वापर करा. डोक्यावर टोपी घाला. यामुळे तुम्ही नक्कीच सुरक्षित राहाल.