मुंबई, 8 जून : पिचाई सुंदरराजन हा तीन दशकांपूर्वी आपल्यासारख्याच एका सामान्य कुटुंबातून मोठा झालेला मुलगा मोठी स्वप्न बघत अमेरिकेत पोहोचला होता. त्याचं नाव Google वर शोधात तर समजेल या जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिन चालवणाऱ्या कंपनीचा तो CEO आहे. सुंदर पिचाई (Sundar Pichai Birthday) यांचा 10 जून हा वाढदिवस. 48 वर्षांचा झालेला हा टेकी कधी काळी भारतात घरी फोन करायला लागणाऱ्या मिनिटाला 2 डॉलरचाही हिशोब करायचा आता तोच एवढ्या उंचीवर कसा पोहोचला याची कथा त्यांनीच एका VIDEO द्वारे सांगितली होती.
सुंदर पिचाई यांचं शिक्षण, संगोपन चेन्नईमध्ये झालं. IIT मधून(Indian Institute of Technology)इंजिनिअरिंग केल्यानंतर मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी ते अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड विद्यापीठात (Stanford University)दाखल झाले होते. 28 वर्षांपूर्वीच्या या स्ट्रगलची आठवण विद्यार्थ्यांना सांगताना सुंदर पिचाई म्हणाले, "त्या वेळी माझ्या वडिलांनी वर्षभराचा पगार माझ्या अमेरिकेच्या विमानप्रवासासाठी दिला होता. अमेरिेत पाऊल ठेवल्यानंतर परिस्थिती कठीण असल्याची जाणीव झाली. खूप महाग वाटली होती तेव्हा अमेरिका. भारतात घरी एक फोन करण्यासाठी 2 डॉलर दर मिनिटाला खर्च करावे लागायचे. इथे एक पाठीवरची सॅक घ्यायची तर त्याची किंमत माझ्या वडिलांच्या महिन्याच्या पगाराएवढी होती."
"त्या परिस्थितीतून आज Google च्या CEO पदापर्यंत मला घेऊन आलं माझं भाग्य आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स", असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
YouTube ने Dear Class of 2020 या सीरिजमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला आहे. कोरोनाव्हायरसच्या लॉकडाऊन काळात पदवीप्रदान कार्यक्रमही ऑनलाइन झाले. त्यामुळे या व्हर्च्युअल कार्यक्रमातून या वर्षी पदवी मिळवणाऱ्या जगभरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रविवारी यामध्ये सुंदर पिचाई यांनी आपल्या संघर्षाची गोष्ट स्वतः सांगून विद्यार्थ्यांना कठीण काळात पेशन्स किती आवश्यक आहे हे समजावून सांगितलं. डिअर क्लास ऑफ 2020 या कार्यक्रमात याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मिशेल ओबामा, लेडी गागा यांनी संदेश दिले आहेत.
इथे पाहा त्यांचं संपूर्ण भाषण..
"बाहेरच्या परिस्थितीमुळे तुम्हाला नैराश्य येईल कदाचित. पण तुम्ही तुमचा संयम सोडू नका. हार मानू नका. त्यातूनच आमच्या पिढीने स्वप्नातही विचार न केलेलं नवं तंत्रज्ञान अस्तित्वात येणार आहे", असं सुंदर पिचाई यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Sundar Pichai